उपराजधानीसह विदर्भासाठी मे महिन्याचा पहिलाच आठवडा तापदायक ठरला होता. त्यावेळी तापमान ४५ अंश सेल्सिअसची पातळी गाठणार असे वाटत असतानाच ते पुन्हा कमी झाले. आता पुन्हा तापमान पंचेचाळीशीच्या उंबरठय़ावर पोहोचले आहे. उपराजधानीत गुरुवारी ४४.५ अंश सेल्सिअससह विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

दिवसभर रखरखीत ऊन आणि दुपारनंतर वादळीवारा, पाऊस हे समीकरण आता बदलले आहे. मे महिन्याचा पहिलाच आठवडा तापदायक ठरला. त्यावेळी तापमानाने पंचेचाळीशी गाठली नसली तरीही आता मात्र तापमान वाढतच आहे. उष्णतेच्या लाटेची खरी झळ आता बसू लागली आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर केलेली टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर लोक घराबाहेर पडू लागले, पण आता उष्णतेच्या लाटांनी त्यांची वाट अडवली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांना वाढत्या तापमानाचा आणि परिणामी उष्ण लाटांचा फटका बसू लागला आहे. हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी कमाल तापमान सरासरीपेक्षाही अधिक म्हणजे ४५ अंशावर राहील, असे संके त दिले होते. ते आता प्रत्यक्षात उतरत आहेत. टाळेबंदी शिथिल झाल्याने रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा त्यांना फारसा त्रास होणार नाही. गुरुवारी नागपूरमध्ये ४४.५, अकोला चंद्रपूर ४४.२ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळ ४३.७, वर्धा ४३.२ तर गोंदियात ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. विदर्भातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर आहे