विदर्भात उष्णतेची लाट काहीशी ओसरल्याने थोडा दिलासा मिळाला आहे, असे वाटत असतानाच बुधवारी पुन्हा एकदा तापमानाचा पारा ४५.८ अंश सेल्सिअसवर गेला. सकाळपासूनच जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यांवर शहरातल्या काही भागात सायंकाळी कोसळलेल्या पावसाच्या सरींनी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, उन्हाची दाहकता कमी होण्याऐवजी वातावरणातील उकाडा पुन्हा वाढला. गुरुवारनंतर मान्सून नाही, पण बेमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात मे महिन्याची अखेर म्हणजे दिवसा कडक उन्हं आणि सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी असे काहीसे वातावरण असते. मान्सूनच्या आगमनाची ती नांदी समजली जाते. यावर्षी क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे मान्सूनचा अंदाज येईनासा झाला आहे. केरळमध्येच मान्सून ७ जूननंतर येणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. त्यामुळे त्यानंतर मुंबई आणि नंतर विदर्भ असे हे चक्र असल्याने पावसाच्या आगमनाची आणखी वाट पाहावी लागणार आहे. मात्र, यादरम्यान सूर्याचे आग ओकणे सुरूच असून तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे असे वाटत असताना आज पुन्हा एकदा पाऱ्याने उचल खाल्ली. नागपूर शहरात बुधवारी ४५.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.ह्ण

  • नागपूर ४५.७ अंश सेल्सिअस
  • बेमोसमी पावसाची शक्यता