मान्सूनचे अंदाज बांधण्यात गेल्या काही वर्षांत चुकणारे हवामान खाते आता तापमानाच्या इशाऱ्याबाबतही त्याच वाटेवर जात आहे. मान्सूनच्या अंदाजाप्रमाणे तापमान इशाऱ्यांशी निगडित रंगबदल गोंधळाची स्थिती निर्माण करणारा आहे.

पर्यावरणात गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने बदल होत आहे. त्यामुळे मान्सून, पाऊस, वादळ, तापमान याचा १०० टक्के अचूक अंदाज देता येत नाही. मात्र, हवामान खात्याकडे असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून अंदाजाच्या जवळपास निश्चितच पोहोचता येते. पाऊस आणि तापमानाचा अंदाज देताना हिरवा, पिवळा, केशरी आणि लाल अशा चार रंगांचा वापर हवामान खात्याकडून केला जातो. हिरवा रंग म्हणजे परिस्थिती अगदी सामान्य, पिवळा रंग म्हणजे परिस्थितीवर लक्ष ठेवा, केशरी रंग म्हणजे धोक्याचा इशारा आणि लाल रंग म्हणजे परिस्थिती अतिशय धोक्याची असून त्वरित कृती करा, असा अर्थ हवामान खात्याच्या भाषेत या रंगांचा आहे. सामान्य माणसांना वैज्ञानिक गणिते कळत नाहीत, पण रंगांमधून दिले जाणारे इशारे त्यांना लगेच कळतात.

दिल्ली येथील भारतीय हवामान खाते आणि नागपुरातील प्रादेशिक हवामान खात्यात समन्वय नसल्याने सर्वसामान्य संभ्रमात पडतात. अवघ्या २४ तासात रंगांच्या माध्यमातून दिले जाणारे इशारे बदलले जात आहेत. पाऊस आणि वादळाच्या बाबतीत एखादेवेळी रंग बदलले जाऊ शकतात, पण तापमानाच्या बाबतीत ते शक्य नाही. मे महिन्याच्या मध्यान्हापासून विदर्भात केशरी आणि लाल रंगांचे इशारे दिले जात आहेत. मात्र, केंद्र आणि प्रादेशिक हवामान खात्यात समन्वयाचा प्रचंड अभाव आहे. सोमवारी देखील दिल्ली येथील केंद्राने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला तर नागपूर केंद्राने विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यंसाठी ‘रेड अलर्ट’ दिला. दिल्ली आणि नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांमध्ये दररोज हवामानाच्या अंदाजासंदर्भात चर्चा होते, हे प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक एम.एल. साहू यांनी देखील मान्य केले आहे. यानंतरही इशारा देणारी यंत्रणा गुंतागुंतीची असेल तर यात सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.

दिल्ली येथील हवामान केंद्रासोबत आमचे दररोज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होत असते. दिल्लीचे केंद्र पूर्ण प्रादेशिकचा विचार करतात, तर नागपूरचे केंद्र प्रत्येक जिल्ह्यचा विचार करून इशारा देतात. अनेकदा आमचे अंदाज सारखेच असतात. कधीकधी फरक यासाठी येतो की लहान लहान गोष्टी ते पाहात नाही आणि आम्हाला त्या लहान गोष्टींचा विचार करूनच अंदाज द्यावे लागतात. परिस्थितीनुसार यात बदल करावे लागतात.

– एम.एल. साहू, उपमहासंचालक, हवामान खाते

भारतासारख्या देशात हवामानातील परिस्थितीत प्रामुख्याने पावसाच्या बाबतीत बदल होत असतात. मात्र, तापमानाच्या बाबतीत स्थिती तितकी बदलत नसते, ज्यामुळे बरेच दिवस आधी अचूक अंदाज किंवा इशारा देता येतो. वारंवार इशाऱ्यात बदल केला तर प्रशासन आणि लोकांमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण होते. कारण प्रसारामाध्यमातून जुने आणि नवीन इशारे एकाच वेळी पसरत असतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत एकसमानता हवी.

– अक्षय देवरस, हवामानतज्ज्ञ