सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर शहरात शनिवारी उष्णतेची लाट तीव्र असताना सुद्धा शुक्रवारपेक्षा तापमानाची नोंद कमी झाल्याने हवामान अभ्यासकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. चंद्रपूर शहरात शुक्रवारी ४५.८ अंश सेल्सिअस तापमान होते, त्या तुलनेत आज उन्हाच्या झळा कितीतरी पटीने अधिक असताना ४५.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपूर शहराबाबतही हीच स्थिती कायम होती. त्यामुळे पुन्हा एकदा हवामान खात्याच्या तापमानाच्या नोंदीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

दरम्यानच्या काळात विदर्भातील काही शहरात वारा आणि वादळी पावसाने पाऱ्यात किंचित घसरण झाली होती. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली. चंद्रपूर शहरात तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. नागपूर शहरात देखील तीन दिवसांपूर्वी वादळी पावसानंतर पाऱ्यात घसरण झाली, पण शुक्रवारी तापमानात वाढ झाली. शनिवारी या दोन्ही शहरांसह विदर्भातील इतरही शहरात उन्हाचे असह्य चटके नागरिकांना बसले. दुपारीही हीच स्थिती होती. सायंकाळी हवामान खात्याच्या तापमान तालिकेत पाऱ्यात चक्क घसरण झाल्याचे दर्शविण्यात आले. चंद्रपूर शहरातील तापमानात ०.६ ची तर नागपूर शहरात ०.४ ची घसरण झाली. या दोन्ही शहरात हवेत आद्र्रता नव्हती. तापमान दर्शवणारे केंद्र अत्याधुनिक असण्याची गरज पुन्हा एकदा हवामान अभ्यासकांनी बोलून दाखवली. अकोला शहरात तापमान ४४.७ वरून तापमान ४४.९ अंश सेल्सिअसवर तर वर्धा शहरात ४४ वरून तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ब्रम्हपुरी ४५ अंश सेल्सिअस तर यवतमाळ शहरात तापमान ४४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवस उन्हाचा हा लपंडाव सुरू राहील, पण त्यानंतर तापमान पुन्हा एकदा उसळी घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.