सकारात्मक चाचण्यांचे प्रमाण १२.३५ टक्के

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत दहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला व ९५५ नवीन रुग्णांची भर पडली. आज सकारात्मक अहवालाचे प्रमाण पुन्हा १२.३५ टक्के आढळल्याने चिंता वाढली आहे.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील ७७७, ग्रामीण २१५, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ९९५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख २० हजार ९८७, ग्रामीण २९ हजार ७२५, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशी एकूण १ लाख ५१ हजार ६६० रुग्णांवर पोहोचली आहे.

दिवसभरात शहरात ५, ग्रामीणला २, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण १० रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८११, ग्रामीण ७७४, जिल्ह्य़ाबाहेरील ७६६ अशी एकूण ४ हजार ३५१ रुग्णांवर पोहोचली आहे.  सोमवारी शहरात ६,०१३, ग्रामीणला २,०४० अशी एकूण ८,०५३  चाचण्या झाल्या. त्यातील  ९५५ बाधितांची संख्या बघता सकारात्मक अहवालाचे प्रमाण पुन्हा १२.३५ टक्के झाले आहे. दिवसभरात शहरात ७,१६९, ग्रामीणला ४,२७७ अशा एकूण ११ हजार ४४६  चाचण्या करण्यात आल्या.

८२ टक्के बाधित शहरातील

शहरात ७,२८४, ग्रामीणला १,५६० असे एकूण जिल्ह्य़ात ८,८४४ सक्रिय  रुग्ण आहेत. ग्रामीणच्या तुलनेत शहरात चारपट म्हणजे ८२ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांतील १,६०८ गंभीर  रुग्ण विविध रुग्णालयांत तर ६,२८१ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ९१.३० टक्क्यांवर

आज शहरात ५०८, ग्रामीण ७१ असे एकूण ५७९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ११ हजार ६३४, ग्रामीण २६ हजार ८३१ अशी एकूण १ लाख ३८ हजार ४६५ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण मंगळवारी घसरून ९१.३० टक्के नोंदवले गेले.

पाच खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू

केंद्र शासनाने शहरातील पाच खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. त्याठिकाणी शासन निर्धारित शुल्क  २५० भरून लस घेता येईल. लता मंगेशकर रुग्णालय, सीताबर्डी, मोघरे चाईल्ड हॉस्पिटल, सक्करदरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँसर रुग्णालयामध्ये लसीकरणाची सुरुवात झाली. बुधवारपासून गिल्लूरकर रुग्णालय, सक्करदरा तसेच सेनगुप्ता रुग्णालय रविनगर येथे शासन निर्धारित शुल्क भरून लसीकरण करण्यात येईल. बुधवारपासून शासकीय रुग्णालयात १०० नागरिकांना टोकन दिले जाणार आहे. त्यानंतर येणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जाईल. सध्या सगळ्या केंद्रांवर  मोठी गर्दी होत आहे. लसीकरण  सुरू राहणार आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी  केले आहे.