शेतीपुरक कामांचा गौरव
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने ‘जय किसान, जय विज्ञान’ असा सप्ताह सादर करून राज्यातील दुग्धोत्पादक, दुग्ध प्रक्रिया, कुक्कुटपालन, शेळी पालन, तसेच मत्स्य व्यवसायाशी निगडीत अतुलनीय काम करणाऱ्यांचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची विस्तार व निरंतर शिक्षण परिषदेची आठवी सभा नुकतीच विद्यापीठाचे कुलगुरू आदित्य मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी २३ ते २९ डिसेंबर हा आठवडा विद्यापीठाने ‘जय किसान, जय विज्ञान’ म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्त दहा प्रगतिशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीमध्ये लातूर जिल्ह्य़ातील मलकापूरचे बळवंत पाटील यांना दुग्ध व्यवसायाकरता, पुणे जिल्ह्य़ातील वाणेवाडीचे डॉ. रवींद्र सावंत यांना दुग्धव्यवसाय, अकोला जिल्ह्य़ातील बेलुराचे अजय गुजर यांना चारा व दुग्ध उत्पादनासाठी, रायगड जिल्ह्य़ातील सासवने येथील डॉ. सुबोध नाईक आणि परभणीचे प्रकाश देशमुख यांना कुक्कुटपालनासाठी, नागपुरातील हुडकेश्वरच्या वैशाली पात्रे शेळीपालन व्यवसायासाठी, पुसदचे प्रफुल्ल भंडारी आणि नांदेड जिल्ह्य़ातील डापका गावचे गंगाधर दापकेकर यांना दुग्ध प्रक्रिया व्यवसायासाठी तसेच लातूर जिल्ह्य़ातील नावंदीचे ब्रम्हा केंद्रे आणि धामनापेठचे मारुती बावने यांना मत्स्य व्यवसायासाठी गौरवण्यात आले. विद्यापीठाने विदर्भ व मराठवाडा या दुष्काळग्रस्त भागात एक हजार गावातून शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन, दुग्ध प्रक्रिया, कुक्कुटपालन, शेळीपालन व मत्स्य व्यवसायाचा अंगिकार करावा म्हणून कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत आजपावेतो ४५० खेडय़ापर्यंत जाऊन विद्यापीठाने शेतकऱ्यांना प्रबोधन केलेले आहे. विद्यापीठाचे त्रमासिक माफसु वार्तापत्र कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी प्रकाशित केले.