संघ मुख्यालयावरील हल्ला

१ जून २००६.. पहाटे ३.३० ची वेळ.. महालातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरातील रहिवासी गाढ झोपेत असताना अचानक गोळीबाराचा आवाज येतो. मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी पोलिसांनी केलेला हा गोळीबार असतो. या आवाजाने परिसर तर जागा होतोच, पण त्यानंतर संपूर्ण देशात या घटनेची प्रतिक्रिया उमटलेली असते. बुधवारी या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही ही घटना परिसरातील लोकांच्या डोळ्यापुढे जशीच्या तशी उभी राहते. आता पोलीस सुरक्षेत वाढ झाली असली तरी आठवणी मात्र कायम आहेत.

सध्या देशात संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सरकारच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात संघाची भूमिका महत्त्वाची ठरते. नागपूरच्या संघ मुख्यालयाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या पाश्र्वभूमीवर दहा वर्षांंपूर्वी या इमारतीवर झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी होते.

संघ मुख्यालय नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. आज जरी तेथील सुरक्षा कवच वाढविण्यात आले असले तरी त्यावेळी आजच्यासारखी सुरक्षा नव्हती. परिसरातील नागरिक, स्वयंसेवकाचे तेथे जाणे-येणे असायचे. कार्यालयात जाण्यासाठी मनाई नव्हती. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक दिवस त्या भागात राहणारे लोक त्या घटनेतून बाहेर पडले नव्हते. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते त्या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांनी ती घटना प्रत्यक्ष याची डोळा बघितली होती. त्यामुळे आजही ती घटना आठवली की त्या घटनेने अंगावर शहारे येत असल्याची प्रतिक्रिया अनेक स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

मोहिते शाखेत जाणारे अनेक स्वयंसेवक त्या घटनेचे साक्षीदार असताना त्यांनीही घटनेनंतर अनेक वर्षे परिसरात दहशतवाद्यांची दहशत असल्याचे सांगितले. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवं. आर.आर. पाटील यांनी घटनेनंतर लगचे संघ कार्यालयाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आदेश दिले होते. आज कार्यालयाच्या भोवती भिंत बांधण्याचे आदेश त्यांनी त्यावेळी दिले होते.

आज केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे संघ मुख्यालय दोन्ही सरकारचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे संघ कार्यालयासह सरसंघचालक मोहन भागवत यांना आता ‘झेड प्लस’ सुरक्षा कवच आहे. संघ मुख्यालयाशी सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह सुमारे १२५ कमांडोंचा ताफा मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी असतो. शिवाय क्यूआरटी आणि पोलिसांच्या विशेष टीमही नेहमीच सज्ज असतात. मात्र परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असली तरी दहा वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या आठवणी मात्र परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना आजही बेजार करतात.

ती गाडी कोतवालीत

संघावर हल्ला करण्यासाठी आलेले तीन दहशतवादी ज्या गाडीने आले होते त्या गाडीमध्ये मोठा शस्त्रसाठा होता. त्या गाडीवर फायरिंग करण्यात आले होते. एम.एच. २० बी ८९२९ या क्रमांकाची ती गाडी असून आज मात्र दहा वर्षांंनंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात अडगळीत पडली आहे. या गाडीवर त्यावेळच्या गोळीबाराच्या खुणा आजही तशाच आहेत.

तो दिवस अजूनही आठवतो

घटनेच्या दिवशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. ही चकमक सुरू असताना कोणालाही बाहेर पडू दिले नाही. काहींनी खिडक्यामधून त्यावेळचे दृश्य बघितले. मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या गल्लीत राहणाऱ्या दफ्तरी आणि दाऊतखानी यांच्या निवासस्थानासमोर गोळ्यांचा खच पडला होता. रायफल, ग्रेनेड पडले होते. पोलिसांनी कमालीचे शौर्य दाखविल्यामुळे परिसरात मोठी घटना टळली होती. आजही दहा वर्षांपूर्वीच्या त्या आठवणीने धडकी भरते

सुरेश दाऊसाक्षीदार, महाल तखानी, घटनेचे