शफी पठाण

‘आता विश्वात्मके देवे..’ अशा शब्दांत अवघ्या जगाच्या हिताचे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या मराठी साहित्यविश्वात आता ‘आमचे-तुमचे’ सांगणाऱ्या संकुचित चौकटी दिवसागणिक प्रशस्त व्हायला लागल्या आहेत. उस्मानाबाद येथे आयोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका विशिष्ट भागातील कवींसाठीच आयोजित केलेल्या सत्राने ही बाब अधोरेखित झाली असून, आयोजक-महामंडळाच्या या छुप्या ‘प्रादेशिक वादा’वर साहित्य वर्तुळातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबादच्या आगामी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ११ जानेवारीला दुपारी साडेचार वाजता केवळ मराठवाडय़ातील कवींसाठीच काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सत्राचे शीर्षकही ‘आमचे कवी, आमच्या कविता’ असे आहे. संमेलन ‘अखिल भारतीय’ असताना असे केवळ एका प्रदेशातील कवींसाठी आरक्षित असणारे सत्र का आयोजित केले? असा सवाल आता साहित्य वर्तुळातून विचारला जात आहे.

आधीच संमेलनात वेळ कमी आणि सारस्वत जास्त, असे समीकरण असते. त्यातही निमंत्रितांच्या कविसंमेलनात मोजक्याच कवींना संधी मिळते. नवोदितांसाठी कवीकट्टा अखंड सुरू असतो, पण त्याला कधीच मुख्य मंडपात जागा मिळत नाही. त्यामुळे कट्टय़ावर कवी खूप, पण श्रोतेच नाहीत, अशी स्थिती प्रत्येक संमेलनात असते. उस्मानाबादमध्ये कविसंमेलन घ्यायचेच होते, तर त्यात केवळ मराठवाडय़ासाठी अशी अट न ठेवता कोकण, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा राज्यातील सर्व प्रदेशांसह बृहन्महाराष्ट्रातील कवींनाही संधी देता आली असती. परंतु संमेलन मराठवाडय़ात असल्याने व त्यासाठीच आयोजक-महामंडळाने या सत्राला ‘आमचे कवी, आमच्या कविता’ असे शीर्षक देऊन मर्यादित करून टाकल्याने साहित्य वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

जो सर्वसाधारण श्रोता असतो तो अखिल भारतात पसरलेल्या मराठी सारस्वताला ऐकण्यासाठी या संमेलनात येत असतो. मराठीची प्रत्येक बोली, उपभाषेतील काहीतरी नवीन या संमेलनात मिळावे, अशी त्याची अपेक्षा असते. ज्यांच्यासाठी हे संमेलन आहे त्या श्रोत्यांच्या या मूळ अपेक्षेला नजरेआड करून केवळ महामंडळ आपल्या घटक संस्थेकडे आहे, म्हणून कुणी साहित्याच्या मंचावर अशा चौकटी निर्माण करत असतील तर ते योग्य नाही.

– हरिश्चंद्र बोरकर, प्रवर्तक, झाडीबोली साहित्य संमेलन

साहित्य महामंडळ ज्या भागात असेल त्या भागात संमेलन झाल्यास तेथील साहित्यिकांचा संमेलनात अधिक भरणा असतो. याआधीही काही ठिकाणी एकाच प्रदेशातील साहित्यिकांना प्राधान्य देणाऱ्या अशा विशिष्ट सत्रांचे आयोजन झाले आहे. विशेष म्हणजे, त्याला विरोधच होत नसल्याने हळूहळू साहित्यविश्वाची अघोषित मान्यताही मिळायला लागली आहे. संमेलनाच्या ‘अखिल भारतीय’ स्वरूपासाठी मात्र हे निश्चितच हिताचे नाही.

– रमजान मुल्ला, प्रसिद्ध कवी, सांगली</p>