देवेश गोंडाणे

अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या दबावामुळे राज्यातील विद्यापीठांनी आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)च्या धर्तीवर परीक्षा घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. ‘सीबीएसई’प्रमाणे विद्यापीठांनाही ‘होम सेंटर’, परीक्षा केंद्र व शहर बदलण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही शैक्षणिक वर्तुळातून जोर धरू लागली आहे.

करोना काळातही विद्यार्थीहीत जपत गुणवत्तेचा कस लावणारी परीक्षा घेण्याचा निर्णय ‘सीबीएसई’ने घेतला. यासाठी परीक्षेच्या धोरणात बदल करत ‘होम सेंटर’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्यासह परीक्षा केंद्र व शहरही बदलता येणार आहे. त्यामुळे विद्यापीठांनीही ‘सीबीएसई’च्या या धोरणाचा अवलंब करून किमान अंतिम वर्षांच्या परीक्षा तरी घ्याव्या, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली होती. अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून शैक्षणिक वर्तुळातील वाढता दबाव बघता राज्य सरकारलाही परीक्षेच्या निर्णयावर फेरविचार करावा लागणार आहे. याची पूर्वकल्पना लक्षात घेत सर्व अकृषक विद्यापीठांनी परीक्षेची तयारी सुरू केली आहे. ‘सीबीएसई’च्या धर्तीवर परीक्षा घेण्याची चाचपणही केली जात आहे. ‘सीबीएसई’ प्रमाणे परीक्षा घेण्याची विनंती काही विद्यापीठांकडून सरकारला केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशी घेता येईल परीक्षा

‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम सारखा असल्याने परीक्षेत एकसूत्रता आणणे शक्य आहे. मात्र, सर्व विद्यापीठांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने विद्यार्थ्यांना हवे ते परीक्षा केंद्र देण्यात अडचण येऊ शकते. मात्र, असे असले तरी सध्या राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन ’ पोहोचत्या केल्या जात आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी टाळेबंदीमुळे विदर्भातील एखाद्या शहरात अडकला असेल तर त्याला येथील अमरावती नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेची मुभा देणे सहज शक्य होणार आहे. यासाठी फक्त पुणे विद्यापीठाकडून त्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका संबंधित विद्यापीठाला ऑनलाइन पाठवता येणार आहे. यासह बहुतांश भागात टपाल सेवा सुरू झाल्याने पालक विद्यापीठाला उत्तरपत्रिका पाठवणे शक्य होणार आहे. या धर्तीवर परीक्षा घ्यावी, अशी मागणी शैक्षणिक वर्तुळात केली जात असून विद्यापीठांनीही तशी तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परीक्षा केंद्रात दुपटीने वाढ

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठांमधील अंतिम वर्षांची विद्यार्थी संख्या कमी आहे. मात्र, टाळेबंदीमुळे पालक विद्यापीठाचे कार्यक्षेत्र वगळता स्वगृही गेलेल्या विद्यार्थ्यांना तेथील केंद्रांवर परीक्षेची मुभा देण्यास अडचण येणार नाही. समाज अंतराच्या कारणाने विद्यापीठांनी परीक्षा केंद्रांत दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या धर्तीवर परीक्षा घेणे विद्यापीठांना सहज शक्य असल्याचा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.