19 January 2018

News Flash

सणासुदीतही कापड बाजारात मंदीचे सावट

सणासुदीच्या काळात कापड व्यापाऱ्यांची खरेदीसाठी लगबग सुरू असते.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: October 3, 2017 3:54 AM

सणासुदीच्या काळात कापड व्यापाऱ्यांची खरेदीसाठी लगबग सुरू असते.

व्यापारी नोटाबंदी, जीएसटीच्या चक्रव्यूहातच अडकलेला; ३५ टक्क्यांनी घसरण

दोन आठवडय़ानंतर येणाऱ्या दिवाळीसाठी व्यापाऱ्यांची एका महिन्यापूर्वी कापड खरेदीला सुरुवात होत असते. मात्र, नोटाबंदी अन् वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) व्यापाऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागला. व्यापारी अजूनही त्यातून सावरले नाहीत. बाजारात ग्राहक नसल्याने मंदीचे सावट कायम आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ३५ टक्के कापड मार्केट खाली घसरलेले आहे.

सणासुदीच्या काळात कापड व्यापाऱ्यांची खरेदीसाठी लगबग सुरू असते. ठोक व्यापारी सुरत येथून ऑगस्ट महिन्यात कापड खरेदी करतात. त्यांच्याकडून किरकोळ व्यापारी सप्टेंबरमध्ये माल घेतात. यंदाचे चित्र वेगळे आहे. सुरतमध्ये कापड व्यापाऱ्यांनी जीएसटी विरोधात संप केल्याने आणि २५ टक्के कर्मचारी कपात केल्याने तेथील ठोक बाजारात मंदी आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रसह नागपूरच्या बाजारपेठेवरही झाला.

कापडाच्या प्रत्येक प्रक्रियेसाठी वेगवेगळी कर आकारणी (जीएसटी) केली जाते. त्यामुळे किंमतीही वाढलेल्या आहेत. पूर्वी कापडावर कर नव्हता. जीएसटीच्या प्रशासकीय पूर्ततेत व्यापारी व्यस्त आहेत. त्यापूर्वी नोटाबंदीचा फटका या क्षेत्राला बसला होता. तसेच पुरेसा पाऊस न झाल्याने नवे पीक अद्याप बाजारात आले नाही. त्यामुळेही मार्केटमध्ये खेळता पसा थांबला आहे. शहरातील किरकोळ कापड दुकाने ग्राहकांविना ओस पडली आहेत. दिवाळीला होणारी कोटय़वधी रुपयांची उलाढाल यंदा मंदावण्याची दाट शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

२०१८ पर्यंत हवी होती सवलत 

जीएसटी ग्राहकांकडून वसूल करून सरकारला द्यायचा आहे. मात्र, बाजारात ग्राहकच नसल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. दिवाळी तोंडावर आहे. बाजार ३५ टक्क्यांनी घसरलेला आहे. व्यापाऱ्यांकडे खरेदीची हिंमत नाही. जीएसटीला विरोध नाही. मात्र, सरकारने २०१८ पर्यंत सवलत द्यायला हवी होती.

– अजयकुमार मदान, अध्यक्ष

दि होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न र्मचट असोसिएशन नागपूर

First Published on October 3, 2017 3:54 am

Web Title: textile market suffer with recession even in festival
  1. No Comments.