पोलीस आणि दी ब्लाईंड रिलिफ असोसिएशन संस्थेची मदत

नागपूर : नांदेडपासून ५० किमीवर एका खेडय़ात राहणारी एक दृष्टिहीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी नागपुरातील अंध विद्यालयातील वसतिगृहात दहावीच्या पेपरसाठी अडकून पडली होती. पण करोनामुळे पेपर रद्द झाल्यानंतर संचारबंदीने तिचे घरी जाण्याचे सारे मार्ग बंद झाले. वसतिगृहात जेवण व राहण्याची सोय होती. मात्र सहकारी नसल्याने तिला एकटेपणा जाणवू लागला. तिने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. पोलिसांची मदत आणि दी ब्लाईंड रिलिफ असोसिएशन संस्थेच्या पुढाकाराने साडेतीनशे किमीचा प्रवास करून ती घरी पोहचली.

मूळची नांदेडजवळील इसलापूर तालुक्यापासून ३० किमीवरील कुट्टी गावात राहणारी नागपूरच्या दी ब्लाईंड रिलिफ असोसिएशनद्वारा संचालित अंध विद्यालयात शिकणारी गंगासागर दहावीत होती. पहिलीपासून ती वसतिगृहात राहायची. दरवर्षी परीक्षा झाली की तिला घेण्यासाठी आई-वडील किंवा भाऊ नागपुरात येत असे. २३ मार्चला दहावीच्या भूगोलाच्या पेपरचा ती अभ्यास करीत होती. मात्र करोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली. दहावीचा पेपर होईल का, त्यासाठी वसतिगृहात थांबायचे का असा प्रश्न तिला पडला. मात्र पेपर रद्द झाला. पण टाळेबंदीमुळे घरी जाण्याचे तिचे सर्व मार्ग बंद झाले.

यामुळे ती वसतिगृहातच अडकून पडली. वडील, भाऊ व वहिनी दुसऱ्या एका गावात अडकले होते. त्यामुळे तिची आई घरी एकटी असल्याने तिला घ्यायला नागपुरात कोण येणार हा मोठा प्रश्न होता.

वसतिगृहातील शिक्षकांनी तिच्या कुटुंबीयांना आधार दिला. मात्र तिला घरी जाण्याची ओढ लागली होती. अखेर प्रसंगाचे गांभीर्य ओळखून संस्थेने तिला घरी पोहचवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यासाठी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक मसाळ यांचे व उपनिरीक्षक कैलास कुथे यांनी परवानगीचे पत्रही दिले. यानंतर विद्यालयातील केअर टेकर, वार्डन अरुणा चौरसिया व अनंत खानखोजे हे तिच्यासोबत काळजीवाहक म्हणून सोबत होते. या सर्वानी ३५० किमीचा प्रवास करत गंगासागरला तिच्या गावी पोहचवून आईच्या सुपूर्द केले. मुलीला पाहून तिच्या आईला अश्रू अनावर झाले. संस्थेने पोलिसांचे आभार मानले.

गंगासागर ही पहिलीपासून संस्थेत शिक्षण घेत आहे. दहावीचा भुगोलचा पेपर रद्द झाल्यामुळे आणि टाळेबंदीनंतर ती विद्यालयातील वसतिगृहात सुरक्षित होती. पण पोलिसांनी परवानगी दिल्याने तिला आम्ही घरी पोहचवून दिले. तिच्या आईने मुलगी घरी सुखरूप आल्यामुळे आईने संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी देऊ  केली. पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे गंगासागरला घरी पोहचवू शकलो.

– मकरंद पांढरीपांडे

अध्यक्ष , दी ब्लाईंड रिलिफ असोसिएशन