16 February 2019

News Flash

स्कूल बसचे शहरातील थांबे निश्चित

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सरकारची उच्च न्यायालयात माहिती

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने बुधवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. या प्रकरणावर सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलली आहे.

९ जानेवारी २०१२ ला शाळकरी मुलाच्या अपघाताची दखल घेत उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल करून स्कूल बसवर देखरेख ठेवणे आणि मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात आणि शाळा स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश वाहतूक आयुक्तांना दिले होते, परंतु काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश शाळांनी स्कूलबस समिती स्थापनच केली नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने, राज्यभरात अशा समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. अनेक शाळांनी त्याचे पालन केले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने बस सुविधा असलेल्या शहरातील १३८ शाळांना प्रतिवादी करून नोटीस बजावली होती. तसेच स्कूल बस ठिकठिकाणी थांबतात व त्यामुळे अपघाताच्या घटना होऊ शकतात. ही बाब लक्षात येताच शहरातील स्कूलबसचे थांबे निश्चित करण्याला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार थांबे निश्चित करण्यात आल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयात दिली. या माहितीसंदर्भात बुधवारी सायंकाळपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलली. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. फिरदोस मिर्झा आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

First Published on September 6, 2018 3:16 am

Web Title: the citys school bus stops are fixed