News Flash

सिंचन घोटाळ्यात सहा जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र

‘घोडाझरी’च्या बांधकामात गैरव्यवहार, शासनाला ७ कोटींचा फटका सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर अधीक्षक कार्यालयामार्फत शनिवारी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याच्या बांधकामात झालेल्या

प्रतिकात्मक छायाचित्र

‘घोडाझरी’च्या बांधकामात गैरव्यवहार, शासनाला ७ कोटींचा फटका

सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर अधीक्षक कार्यालयामार्फत शनिवारी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराचा तपास करून नागपुरातील वजनदार मंत्र्याच्या निकटवर्तीयासह एकूण ६ जणांविरुद्ध पदाचा गैरवापर करणे, भ्रष्टाचार करणे आणि फसवणूक करण्याच्या गुन्ह्य़ांतर्गत ६ हजार ४५० पानांचे आरोपपत्र विशेष सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्यासमक्ष दाखल करण्यात आले.

तत्कालिन मुख्य अभियंता आणि निविदा प्रक्रियेतील पूर्वअर्हता मूल्यांकन अधिकारी सोपान रामराव सूर्यवंशी (रा.औरंगाबाद), समितीचे सदस्य सचिव तत्कालिन कार्यकारी अभियंता रमेश डी. वर्धने (रा.नागपूर), तत्कालिन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास सहदेव मांडवकर (रा.नागपूर), तत्कालिन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर (रा.नागपूर), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालिन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे आणि कालव्याच्या कामाचे कंत्राट मिळविणारे एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक निसार फतेह मोहंमद अब्दुला खत्री (रा.मुंबई), अशी आरोपींची नाव आहेत. याशिवाय, इतर आरोपींचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध तपास सुरू असल्याने या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.  गेल्या २००६ मध्ये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या घोडाझरी शाखा कालव्याच्या ४२.६० ते ८०.०० कि.मी.पर्यंतच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांशी संगनमत करून पूर्वअर्हता छाननी समितीने त्यांना अधिक गुण दिले आणि १०१ कोटी १८ लाख ८० हजार ३९५ रुपयांचे कंत्राट मिळवून दिले. एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने बनावट पूर्वानुभव प्रमाणपत्र दाखल केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती. शिवाय, अधिकाऱ्यांनी कंत्राटाचे अद्यावतीकरण करून बांधकामाच्या खर्चात वाढ केली, त्यामुळे शासनाला ७ कोटी ३८ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले.

खोलापूरकरचा ‘वाडय़ा’शी संबंध

यातील आरोपी संजय खोलापूरकर हे संघपरिवाराशी निगडीत कुटुंबातून आहेत. त्यांचा नागपुरातील वाडय़ाशी जवळचे संबंध असल्याची माहिती आहे. देशात सत्तेत आल्यानंतर वजनदार मंत्र्यांनी त्यांना व्यक्तिगत पातळीवर विशेष कार्य अधिकारी म्हणूनही नेमले होते. सिंचन घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर मंत्र्यांनी त्याला दूर सारले. या प्रकरणातून त्याचे नाव वगळण्यात यावे, यासाठी तत्कालिन एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव टाकण्यात आला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती, परंतु त्यांनी खोलापूरकरविरुद्ध ठाम भूमिका घेतल्यानेच एफआयआरमध्ये आरोपी नसलेला खोलापूरकर आरोपपत्रात आरोपी करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2016 3:49 am

Web Title: the first chargesheet against six persons in irrigation scam
Next Stories
1 ज्येष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार
2 तस्करीतील ‘त्या’ आठ पक्ष्यांची सुटका अधांतरीच
3 बडतर्फ कर्मचाऱ्यांना ‘एसटी’त पुन्हा सेवेची संधी
Just Now!
X