चटपटीत खाण्याची सवय आजारांचे कारण; आहार तज्ज्ञ म्हणतात, हिरव्या भाज्या, कडधान्य खा

प्रत्येकाच्या जिभेला चटपटीत खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात तेल, मीठ, साखरेचे सेवन वाढून लठ्ठपणा वाढत आहे. जिभेचा हा मोह शरीरावर भारी पडत आहे. परिणामी, वेगवेगळे आजार डोके वर काढायला लागले आहेत. निरोगी समाजाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. म्हणूनच आता डॉक्टर हिरव्या भाज्या, कडधान्य खाण्याचा सल्ला देत आहेत. प्रत्येकाने रोजच्या तुलनेत अन्नपदार्थात तेल, मीठ, साखरेचे प्रमाण अर्धे करून आहारात सलाद, कडधान्य, हिरव्या भाज्यांचा वापर वाढवल्यास सहज लठ्ठपणा नियंत्रणासह संभाव्य आजार टाळता येतील, असा आहार तज्ज्ञांचा दावा आहे.

उपराजधानीसह सर्वत्र सर्वच वयोगटामध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणाला आवश्यकतेहून जास्त कॅलरीयुक्त अन्नपदार्थाचे सेवन हे प्रमुख कारण आहे. या कॅलरीजवर नियंत्रणातून वजन कमी करता येते. त्यासाठी प्रत्येकाने सकाळी ११ पूर्वी नित्याने हंगामी फळांचे सेवन करायला हवे. फळांमध्ये पपई, सफरचंद, नाशपती, संत्री, मोसंबीचा वापर हवा. जेवणापूर्वी काकडी, गाजर, मुळा, बिट या सलादचे सेवन वाढवावे. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटून जेवण कमी होते. जेवणात भात कमी खाण्यासह भाजीपाला, फळभाज्या, कडधान्य (मूग, अंकुरलेली मोट,चना)चे प्रमाण वाढवावे. एकाच वेळी जास्त खाण्यापेक्षा दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खावे. जेणेकरून भुकेची तीव्रता कमी होऊन जेवण कमी होते, असे आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पूर्वी कष्टाचे काम करण्याऱ्या लोकांना तेल, तूप, गोड खाण्याचा सल्ला दिला जात होता. हाच आहार नवीन पिढीने स्वीकारला, परंतु कष्ट, व्यायामाकडे दुर्लक्ष झाले. अन्न पोटात गेले तर काहीही होवो, पण जिभेला नाराज करायचे नाही, अशी अनेकांची भूमिका असते. पूर्वी आहारामध्ये कोंडायुक्त पिठाचा तसेच तंतुमय पदार्थाचा वापर जास्त असायचा. आता फास्ट फूडसह इतर पदार्थाचे सेवन वाढल्याने मैद्याचा वापर जास्त होतो. त्यामुळे लठ्ठपणा लहान मुलांपासून सर्वच वयोगटात वाढला आहे.

दोन हजार कॅलरीजही हानिकारक

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला त्याच्या उंची व वजनाच्या प्रमाणात वेगवेगळ्या कॅलरीजची गरज असते. हल्ली बहुतेक लोक दिवसाला दोन ते तीन हजार कॅलरीज असलेले अन्न सेवन करतात. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी १,३०० ते १,५०० कॅलरीजची आवश्यक आहे, परंतु दिवसभर फार हालचाली नाहीत, ऑफिसमध्ये बैठे काम, अशा माणसाला दिवसाला दोन हजार कॅलरीजही खूप जास्त होतात. या व्यक्तीने रोजच्या जेवणात तेल, गोड, मिठाचे प्रमाण कमी केल्यास त्याला लठ्ठपणाबाबत लाभ होतो. रस्त्यावर दगड फोडणारे, इमारतीसह इतर कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीला मात्र तीन हजारच्या जवळपास कॅलरी असलेल्या अन्नाची गरज असते. या कॅलरीज कष्टाचे काम करताना कमी होत असल्याचे आहार तज्ज्ञ सांगतात.

वाढदिवशी केकऐवजी फळ कापा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चीन नंतर भारतात एक कोटी ४४ लाखांच्या जवळपास मुले लठ्ठ आहेत. उपराजधानीतही ही संख्या वाढत आहे. आहारातील बदलासह बेकरीत तयार होणारे केक, पेस्ट्रीसह इतर पदार्थाचे सेवन कमी करून लठ्ठपणावर नियंत्रण शक्य आहे. त्यासाठी वाढदिवशी केक कापण्याच्या प्रचलित संस्कृती ऐवजी फळ काप्यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्याची गरज आहे.

– डॉ. सुनील गुप्ता, मधुमेह तज्ज्ञ, नागपूर</p>

तेल, साखरेचे प्रमाणा दुपटीहून जास्त

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उंची, काम व वजनानुसार साधारण ५०० ते ७५० ग्रॅम तेल विविध अन्नपदार्थातून सेवन करणे गरजेचे आहे, परंतु सध्या दुप्पटच्या जवळपास तेल सेवन केले जाते. साखर सेवन करण्याचेही प्रमाण दुपटीहून जास्त आहे. प्रत्येकाला रोज पाच ते दहा ग्रॅमहून जास्त साखर घ्यायला नको. पाच ग्रॅम साखरेतून २० कॅलरीज वाढते. त्यामुळे जास्त साखरेमुळे लठ्ठपणा वाढतो. मिठाचेही प्रमण दिवसाला तीन ते चार ग्रॅमहून जास्त नको. प्रत्येकाने दिवसाला एक चम्मच तेल, साखर, मीठ कमी केल्यास संबंधिताला लाभ शक्य आहे.

– जान्हवी होगे, आहार तज्ज्ञ, मेडिकल, नागपूर.

वजन कमी करण्यासाठी हे करा

*     रोजच्या अन्नात नेहमीच्या तुलनेत तेल, साखर, मिठाचे प्रमाण कमी करा

*     तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा

*     जेवण्यापूर्वी सलाद खाण्याचे प्रमाण वाढवा

*     सकाळी उठल्यावर व्यायाम करा

*     नैराश्यापासून दूर राहा