नागपूर : जंगलालगतच्या शेतातील विहिरींना कठडे बांधण्यासाठी वनखात्याची श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आणि केंद्र सरकारच्या योजना अस्तित्वात आहे. मात्र  प्रत्यक्ष अंमलबजावणीअभावी कागदावरच या योजना असल्यामुळे वाघ, बिबटय़ासह तृणभक्षी व इतर वन्यप्राणी विहिरीत पडत आहेत. त्यामुळे या कठडे नसलेल्या विहिरी आणखी किती जीव घेणार, असा प्रश्न उपस्थित के ला जात आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्य़ातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा ‘नाकाडोंगरी पॅटर्न’ यशस्वी ठरला असून तो राज्यव्यापी राबवण्याची मागणी होत आहे.

भंडारा जिल्ह्य़ातील वाघांच्या तीन बछडय़ांच्या मृत्यूने कठडय़ाविना असलेल्या विहिरी आणि वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जंगलातील तसेच जंगलालगतच्या शेतातील विहिरींची माहिती प्रत्येक परिक्षेत्रातून पाठवण्यासंदर्भात सुमारे दहा वर्षांपूर्वी वनखात्याने पत्र काढले होते. त्यानंतर अशा विहिरींना कठडे बसवण्याची कामे तात्काळ पूर्ण करून अहवालही मागवण्यात आला होता. मात्र, क्षेत्रीय अधिकारी आणि वरिष्ठ या विषयावर गंभीर नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आता स्पष्ट झाले आहे. आजही अनेक जुन्या विहिरी जंगलात तसेच जंगलालगतच्या शेतात आहेत. अशा संवेदनशील भागात सर्वेक्षण करून माहिती मागवण्यात आली, पण ही बाब कनिष्ठ आणि वरिष्ठ कु णीही गांभीर्याने घेतली नाही. परिणामी उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वणवण भटकताना आणि पावसाळ्यात विनाकठडय़ाच्या तुडुंब भरलेल्या विहिरी न दिसल्यामुळे वन्यप्राणी त्यात पडत आहेत. बरेचदा तृणभक्षी प्राण्यांच्या मागे कु त्रे लागल्यामुळे पळताना विहिरीत पडूनही त्यांचा जीव गेला आहे. वाघ, बिबटय़ासह असंख्य वन्यप्राणी सातत्याने कठडय़ाविना असलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडत आहेत. यात वनखात्याची हानी तर होतेच शिवाय बचाव पथकाचे कामही वाढते. मात्र, ज्या भंडारा जिल्ह्य़ात वाघांच्या बछडय़ाचा मृत्यू झाला, त्याच जिल्ह्य़ातील नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी विहिरींना कठडे बांधण्यात उत्कृ ष्ट कामगिरी बजावली आहे. केंद्र सरकारची येाजना व श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत त्यांनी अवघ्या दहा लाख रुपयात संवेदनशील परिसरातील सुमारे ३९ विहिरींना कठडे बांधले आहेत. त्यामुळे या परिसरात वन्यप्राणी विहिरीत पडण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे.

केंद्रपुरस्कृ त योजना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत उपवनसंरक्षकांनी एक अर्थसंकल्प तयार के ला. त्यानंतर आम्ही जंगलाला लागून असणाऱ्या शेतातील विहिरी, ज्याठिकाणी अशा घटना होण्याची भीती आहे, अशा गावांमधील विहिरी निवडल्या. काही कमी व्यासाच्या तर काही अधिक व्यासाच्या जुन्या विहिरी देखील होत्या. आम्ही  या शेतकऱ्यांना कठडे बांधून घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठांचा विश्वास आणि सहकार्यामुळेच २०१९-२० या कालावधीत त्या विहिरींवर कठडे बांधण्याचे काम पूर्ण झाले. तेव्हापासून आजतागायात या परिसरात वन्यप्राणी विहिरीत पडल्याची एकही घटना नाही.

नितेश धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकाडोंगरी

वन व वन्यजीव अधिवासालगतच्या परिसरातील कठडे नसलेल्या विहिरी वन्यप्राण्यांसाठी घातक ठरत आहेत. अशा संवेदनशील भागातील विहिरींना कठडे बांधण्यासाठी प्रभावी नियोजन केल्यास वन्यप्राण्यांना व पर्यायाने शेतकऱ्यांनाही ते उपयोगी ठरेल. यासाठी भंडारा जिल्ह्यतील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी राबवलेला ‘नाकाडोंगरी पॅटर्न‘ राज्यव्यापी करणे गरजेचे आहे.

– यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.