बिहारमधील भाजपच्या दारुण पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी-शहा या जोडगोळीच्या पक्षावरील वर्चस्वाला आव्हान देत ‘खऱ्याला खरे म्हणणे ही जर बंडाळी असेल तर मी बंडखोर आहे,’ असे ठासून सांगितले.

दिल्ली, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात पक्षाचा पराभव झाला तेव्हा अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी बोलले होते. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. आता मी एक ‘गरीब आणि शरीफ’ तेवढा कारवाईसाठी उरलो काय? असा सवाल करून संभाव्य पक्ष कारवाईबाबत त्यांनी भाष्य केले. नागपुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.
सिन्हा म्हणाले, बिहार निवडणुकीच्या काळात डाळीचे वाढलेले दर कमी करा, पक्षातील ज्येष्ठांचा सन्मान करा आणि बिहारी आणि बाहरी हा मुद्दा निकाली काढा, असे म्हणालो. पक्ष नेतृत्त्वाने या गोष्टींकडे लक्ष दिले असते तर पक्षाला लाभ झाला असता.