महेश बोकडे

९७ रुग्णालयांत एक आकडीच रुग्ण

नागपूर :  जिल्ह्य़ात मार्च २०२१ ते मे २०२१ च्या पहिल्या आठवडय़ापर्यंत करोनाच्या उद्रेकामुळे गंभीर रुग्णांना खासगी व शासकीय कोविड रुग्णालयांत रुग्णशय्या उपलब्ध होत नव्हत्या. परंतु आता करोना नियंत्रणात आल्याने ९१ कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. ९१ रुग्णालयांत १ ते ९ दरम्यान एक आकडी संख्येत रुग्ण दाखल असल्याने या रुग्णालयांना वेतनासह इतरही खर्च काढणे कठीण झाले आहे.

नागपूर जिल्ह्य़ात लहान-मोठी साडेसहाशे ते सातशेच्या जवळपास खासगी रुग्णालये असून येथे सुमारे १० हजारच्या जवळपास खाटा उपलब्ध आहेत. नागपुरात करोनाचा उद्रेक झाल्यावर  महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने  मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयांसह महापालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये अशी मिळून एकूण २३१ रुग्णालयांत कोविड रुग्णालये वा कोविड केअर सेंटर सुरू केले. मार्च २०२१ ते मे २०२१ च्या पहिल्या आठवडय़ापर्यंत या सर्व रुग्णालयांत सर्व रुग्णशय्या गंभीर रुग्णांनी भरल्या होत्या. रुग्णांना नागपुरातील रुग्णालयांत रुग्णशय्या मिळत नसल्याने काही रुग्णांना अमरावतीसह शेजारच्या जिल्ह्य़ांतील रुग्णालयांत दाखल होऊन उपचार घ्यावे लागले. आता मात्र  करोनाचा प्रभाव ओसरत आहे. १ जून २०२१ रोजी  गंभीर संवर्गातील १ हजार ७१७ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालये वा कोविड केअर सेंटरमध्ये तर इतर ३ हजार ९०२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

यातील ४३ रुग्णालयांतच १० हून अधिक रुग्ण दाखल असल्याने इतर १८८ रुग्णालयांना  खर्च कसे काढावे, हा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनकडून या रुग्णालयांना गैरकरोनामध्ये वर्ग करण्याची विनंती केल्यावरही त्याकडे महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात  आहे.  त्यांनी हे रुग्ण घेण्याचे ठरवले तरी येथे कोविड रुग्णालय असल्याने इतर रुग्ण  यायला तयार होत नाही.

बहुतांश रुग्णालयांनी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी बँकेतून मोठे कर्ज घेतले.  मनुष्यबळ वाढवल्याने  वेतनावरील खर्चही वाढला. आता करोनाचे रुग्ण कमी झाल्याने अचानक त्यांना कामावरून कमी करता येत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने मागणी केलेल्या खासगी रुग्णालयांना गैरकरोना रुग्णालय केल्यास इतर रुग्णांवर उपचार करून  आर्थिक अडचण दूर होऊ शकते.

डॉ. अशोर अरबट, अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन, नागपूर.

‘खासगी कोविड रुग्णालये वा कोविड केअर सेंटरमध्ये  रुग्ण कमी असले तरी या रुग्णालयांना पूर्णपणे गैरकरोनामध्ये तूर्तास वर्ग करणे शक्य नाही. परंतु या रुग्णालयांना गैरकरोना रुग्णांवर उपचार करायला कुणीही थांबवलेले नाही.

डॉ. संजय चिलकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी,  महापालिका.

रुग्णशय्येची स्थिती

नागपूर शहरात १३ मे २०२१ रोजीपर्यंत करोना रुग्णांसाठी प्राणवायूच्या ४ हजार ८६५ रुग्णशय्या, अतिदक्षता विभागातील २ हजार २७४ रुग्णशय्या तर जीवनरक्षण प्रणाली (व्हेंटिलेटर) असलेल्या ५८१ शा एकूण ७ हजार ७४५ रुग्णशय्या उपलब्ध होत्या.