अयोग्य व्यायामामुळे शारीरिक व्याधीला आमंत्रण

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : अलीकडे सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरात व महानगरात ठिकठिकाणी उघडलेल्या खासगी व्यायामशाळा (जिम) हे त्याचेच द्योतक आहे. मात्र या व्यायामशाळा कशा असाव्यात, त्यातील उपकरणे कोणती असावीत, प्रशिक्षकांची अर्हता काय असावी, याबाबत निश्चित शासकीय धोरण नाही. व्यायामशाळाचालक केवळ व्यावसायिक दृष्टीने या व्यवसायाकडे बघत आहेत. याचा फटका येथे व्यायाम करणाऱ्या अनेकांना बसत आहे.

ठाण्यातील शरीर सौष्ठव नावेद जमील खान आणि नृत्य कलावंत मेघना देवगडकर दोघांचा गेल्या दोन महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला.  नावेदच्या प्रकरणात स्टेरॉईडचे सेवन तर मेघनाच्या प्रकरणात वजन कमी करण्याची औषध घेतल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आल्याने असे काही खाण्याचा सल्ला देणाऱ्या जिमच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातच हल्ली अनेक जिम प्रशिक्षक कमी वेळात दणकट शरीरयष्टीसाठी तरुणांना स्टेरॉईड्स किंवा प्रोटीन पावडर (सप्लिमेंट) उत्तम पर्याय असल्याचे सांगतात. त्यांना आहाराबाबत माहितीच नसते. प्रत्यक्षात नॅचरल पावडर कडधान्य, चिकन, दूध, मासोळीसह इतर पदार्थापासून तयार होते.

ते किती खावे, हे आहार तज्ज्ञच सांगू शकतात. परंतु सध्या मनात येईल तसे प्रोटीन पावडर सेवन केले जात आहे. त्यामुळे अनेकांना मूत्रपिंड, यकृतसह इतरही व्याधी जडत आहेत. काही जिममध्ये स्टेरॉईड्स घेऊनही व्यायाम केले जात आहेत. या गंभीर प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही. दुसरीकडे अमेरिकेसह पाश्चिमात्त्य  देशातील जिममध्ये व्यायाम शिकवणाऱ्यांना विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय प्रशिक्षण देता येत नाही. भारतात मात्र याविषयी धोरणच नाही. परिणामी, सगळ्याच शहरांत जिममध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता नसलेल्या प्रशिक्षकांकडून हे प्रशिक्षण दिले जात आहे. चुकीचे व्यायाम केल्याने अनेकांच्या आरोग्यावर दुष्परिणामही जाणवायला लागले आहेत. अनेक व्यायामशाळेत व्यायाम कसा करावा, हे शिकवण्यासाठी प्रशिक्षक असतात. हे प्रशिक्षक वेट ट्रेनिंग, एरोबिक्स शिकवतात. हे शिकवताना योग्य स्नायूवर जोर पडून त्या भागाचा व्यायाम होणे अपेक्षित असते. हे करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असते, मात्र देशात अनेक व्यायामशाळांमध्ये केवळ अनुभव असल्याचा दाखला पाहून प्रशिक्षकांची नियुक्ती होत आहे. देशात जिममधील व्यायाम प्रशिक्षणाबाबत फारसे अभ्यासक्रमही नाहीत.

असे आहे अर्थचक्र!

याबाबत ठोस धोरण ठरल्यास जिममधील प्रशिक्षकाचे विविध अभ्यासक्रम, त्यासाठीची शैक्षणिक अर्हता निश्चित होईल. जिममधील व्यायामासाठी आवश्यक सुविधा, जिमसाठी किमान व कमान जागा किती असावी हे निश्चित होईल. त्यातच या जिममध्ये हल्ली जास्त कमाई करण्यासाठी प्रशिक्षकांना जास्तीत जास्त उमेदवार मिळवण्याचे लक्ष्य दिले जाते. ते लक्ष्य गाठल्यास अतिरिक्त मानधन दिले जाते. जास्त पैसे मिळवण्यासाठी हे प्रशिक्षक जिमच्या सदस्यांना विविध कंपन्यांचे प्रोटिन पावडर खाण्याचा सल्ला देतात. हे पावडर डॉक्टरांसह आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला जात नाही.

मसल्स बनवण्यासाठी जगात एकही औषध नाही. परंतु मोठी कमाई करण्यासाठी अनेक जिममध्ये सर्रास प्रोटिन्स पावडर, स्टेरॉईडची विक्री उघड वा छुप्या पद्धतीने होत आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार त्याला त्याच्या शरीरात काही प्रोटिन, मिनरल्स कमी असल्यास ते आहार तज्ज्ञ व डॉक्टरांच्या सल्यानेच घ्यायला हवे. परंतु प्रोटिन पावडरवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते सहज कुठेही मिळते. त्यामुळे जिमचालक कमाई करण्यासाठी विविध कंपनीशी साटलोट करून ते सहज कुणालाही उपलब्ध करतात. चुकीच्या पावडरच्या सेवनाने अनेकांना मुत्रपिंड, यकृत, अस्थीसह इतरही शरीराच्या अवयवांशी संबंधित आजार होतात. काहींचा दुदैवी मृत्यूही या प्रकाराने झाला आहे. त्यावर नियंत्रण आवश्क आहे.

– डॉ. वासूदेव गाडेगोने, निर्वाचित राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशन  (२०२०- २१), महाराष्ट्र

शासनाचे जिम संदर्भात ठोस धोरण नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी या विषयाचे शिक्षण न घेतलले प्रशिक्षक अनुभवाच्या जोरावर जिममध्ये शिकवतात. या सगळ्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. देशात जिम ट्रेनिंगचा अभ्यासक्रमाबाबत एकही काऊंसिल नाही. त्यामुळे आम्ही युरोपीयन काऊंसिलसोबत करार करून नागपुरात काही अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

– अनिरुद्ध आखरे, जिम प्रशिक्षक. (शिक्षण-  इंटरनॅशनल सर्टिफिकेट इन फिटनेस, अमेरिका)

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, ठाणेसह राज्यभऱ्यात सातत्याने जिममधील व्यायामासह इतर गोष्टींचे प्रशिक्षण देतोय. सध्या निवडक जिम सोडले तर राज्यातील सर्वच शहरांतील जिममध्ये चुकीच्या पद्धतीने व्यायाम शिकवणेसह इतरही गैर प्रकार पुढे येतात. त्याने अनेकांना शारीरिक व्याधीही जडतात. शासनाने तातडीने जिमबाबत धोरण निश्चित करून स्वतंत्र फिटनेस काऊंसिल गठीत करायला हवी. त्यातून जिमचे नियम निश्चित होऊन गैरप्रकार संपुष्टात येईल.

डॉ. धनंजय मोरे, संचालक, डॉ. धनंजय मोरे, फिटनेस सोल्यूशन, मुंबई.