* विकृतीशास्त्र विभाग रक्तपेढय़ांच्या कामातच समाधानी

* गरीब विद्यार्थ्यांना स्वस्तात पदव्युत्तर शिक्षण कसे मिळणार?

महेश बोकडे

शासनाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्यवस्थ करोनाबाधितांवर  रक्तद्रव्य उपचार उपलब्ध केला. त्यासाठी आवश्यक यंत्र उपलब्ध झाले. परंतु विकृतीशास्त्र विभागात इम्युनो हिमॅटॉलॉजी अ‍ॅन्ड ट्रान्सफ्यूजन मेडिसीन (आयएचबीटी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात कुणालाही रस दिसत नाही. राज्यात एकाही महाविद्यालयात हा अभ्यासक्रम नसल्याने गरीब विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम करायचा कुठे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

राज्यात एकूण १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. सर्व महाविद्यालयांमध्ये विकृतीशास्त्र विभागाच्या अखत्यारित रक्तपेढी उपलब्ध आहे. या विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांसह इतरही वरिष्ठ डॉक्टर आहेत. परंतु मुंबईच्या ‘जेजे’सह एकाही महाविद्यालयांमध्ये या रक्तपेढींशी संबंधित अद्ययावत पदव्युत्तर आयएचबीटी अभ्यासक्रम  नाही. त्यामुळे येथील रक्तपेढय़ांमध्ये केवळ रक्त देणे आणि घेणे एवढेच काम होत असते.

पूर्वी या रक्तपेढय़ांमध्ये रुग्णांना रक्तघटक वेगळे न करता अखंड रक्त दिले जात होते. कालांतराने रक्तातील विविध घटक वेगवेगळे करून दिले जाऊ लागले. आता काही देशात अत्यवस्थ करोनाग्रस्तांवर रक्तद्रव्य उपचार प्रभावी ठरले आहेत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तद्रव्य उपचार उपलब्ध केला. त्यासाठी तातडीने आवश्यक यंत्र उपलब्ध केले. दरम्यान शासनाने येथे काही पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास आयएचबीटी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणे शक्य आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना स्वस्तात हा अभ्यासक्रम करता येईल. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाचे शुल्क जास्त असल्याने ते सामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

भारतीय वैद्यकीय परिषदेकडून (एमसीआय) विकृतीशास्त्र विभागाच्या शिक्षकांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचा मार्गदर्शक म्हणून मंजुरी मिळू शकते. यासाठी एमसीआयचा सदस्य म्हणून मी स्वत: मदत करेल. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगली संधी व रक्तघटकाशी संबंधित जळीत, सिकलसेल व थॅलेसेमियासह इतर रुग्णांना चांगला उपचार मिळू शकेल.

– डॉ. कैलाश शर्मा, अधिष्ठाता (शैक्षणिक), टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई.

हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ट्रान्सफ्यूजनशी संबंधित प्राध्यापकांसह इतर शिक्षकांची कमी आहे. ते मिळताच अभ्यासक्रमासाठी प्रयत्न केले जातील.

– डॉ. तात्याराव लहाने, संचालक , वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई