गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

नागपूर : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक हे महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती माध्यमांतूनच समजत आहे. अद्यापही केंद्र सरकारकडून अधिकृत पत्र राज्य सरकारला प्राप्त झाले नाही. तपासाचे दस्तावेज सोपवण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मंगळवारी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचे उद्घाटन झाले. यावेळी गृहमंत्री प्रसारमाध्यमांशी  बोलत होते. केंद्राने अचानक या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केंद्र व राज्यात सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला असून राज्य सरकारला विचारणा न करता केंद्राने निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘एनआयए’कडे दस्तावेज सोपवणे बंधनकारक

एनआयएकडे तपास सोपवण्यात आल्यानंतर प्रकरणाचे दस्तावेज त्यांच्याकडे सोपवावे लागतात. ही बाब राज्य सरकारसाठी बंधनकारक असते. आजवर महाराष्ट्र पोलिसांनीही तसेच केले आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचे दस्तावेज सोपवण्यासंदर्भात पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे एनआयएला सहकार्य करतील व आजवरची परंपरा कायम राखतील, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.