महानिर्मितीच्या कोराडीतील १९८० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ १० मिनिटे उपस्थित होते. या कार्यक्रमावर तीन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे कंपनी आर्थिक अडचणीत असताना झालेला हा खर्च चर्चेचा विषय ठरला आहे.

पंतप्रधान येणार म्हणून कोराडीच्या वीज प्रकल्पात महानिर्मितीने जय्यत तयारी केली होती. भव्य मंडप, फुलांची सजावट, अनेक वातानुकूलित यंत्रे लावण्यात आली होती. या अल्पवेळ कार्यक्रमावर सरासरी तीन कोटींचा खर्च झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना वीज केंद्राची माहिती दिली. दहा मिनिटांत त्यांचा हा कार्यक्रम संपला. नागपुरातील क्रीडा संकुलातील कार्यक्रमातही पंतप्रधानांच्या हस्ते वीज निर्मिती संच लोकार्पणाचा  कार्यक्रम पार पडला. त्यामुळे त्यांच्या कोराडी दौऱ्याचे औचित्य काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. दरम्यान, या  संदर्भात कोराडी वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तीन कोटी रुपयांच्या खर्चाची बाब नाकारली. महानिर्मिती सध्या आर्थिक अडचणीत आहे, त्यातच राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार प्रत्येक वीज कंपनीला वीजनिर्मिती करायची आहे. त्यानुसार सर्वात कमी प्रति युनिट वीज दर असलेल्या संचातून प्रथम व त्यानंतर इतर संचातून महावितरणला वीज घ्यावी लागते. त्यानुसार महानिर्मितीचे बरेच संच बंद आहेत. त्यामुळे महानिर्मितीवर प्रति युनिट वीज दर कमी करण्याचे मोठे आव्हान असून त्यानुसार ते काम करीत असल्याचा व्यवस्थापनाचा दावा आहे. परंतु या पद्धतीने कार्यक्रमावर खर्च केल्यास महानिर्मितीला प्रति युनिट विजेचे दर कमी करणे शक्य आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कार्यक्रमावर किती खर्च आला याची माहिती नाही. परंतु वीजनिर्मिती केंद्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देणे महत्त्वाची बाब आहे. शेकडो रुपयांचा खर्च झाल्यावर वीज निर्मिती दरात एक पैसा वाढ होते, तेव्हा या खर्चाचा वीज दरवाढीशी संबंध जोडणे योग्य नाही.   महेश आफळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती