X

वर्दीतील नराधमांनी  माझे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त केले

एका हॉटेलमध्ये तीन लोकांना लुटण्याच्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा पोलिसांनी अ‍ॅन्थोनी नावाच्या इसमाला शोधत आमचे घर गाठले.

त्यांना जन्मठेपच व्हायला हवी; कोठडीत मृताच्या पत्नीचा संताप

‘सदरक्षणाय, खलनिग्रहनाय’ असे ब्रीद मिरवणाऱ्या खाकी वर्दीतील नराधमांनीच माझे संपूर्ण कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या पतीच्या मृत्यू प्रकरणातील दोषी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सात वर्षांची शिक्षा पुरेशी नसून त्यांना जन्मठेप व्हायला हवी, अशी संतप्त भावना मृत जॉयनस अ‍ॅडम इलामट्टी यांची पत्नी जरीन (५०) यांनी व्यक्त केली.

एका हॉटेलमध्ये तीन लोकांना लुटण्याच्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा पोलिसांनी अ‍ॅन्थोनी नावाच्या इसमाला शोधत आमचे घर गाठले. एक खाकी वर्दीतील व नऊ साध्या वेशातील पोलीस होते. माझे पती जॉयनस हे रेल्वेत खलासी म्हणून नोकरीवर होते.

त्यांना रात्री १२.३० वाजता या पोलिसांनी ताब्यात घेतले. माझ्या हातावर दंडा मारून पती जॉयनसला फरफटत घराबाहेर नेले. विजेच्या खांबाला बांधून त्याला दांडय़ाने मारण्यात आले. मला बघवले नाही, त्यामुळे मी खांबाला बांधलेल्या पतीला बिलगले. पोलिसांनी काहीही दयामाया न दाखवता माझ्य़ाही पाठीवर पट्टय़ाने मारायला सुरुवात केली. मध्यरात्री सर्वत्र सामसूम असल्याने ‘बचाव, बचाव’चा आवाजही कुणी ऐकला नाही. शेवटी पोलिसांनी पतीसह मला व मुलांना राणी कोठी येथे नेले.

वाहनातून नेत असताना  पतीला सोडण्याची विनंती केली तर ते बलात्काराची धमकी देत होते. त्या रात्री मला दुसरीकडे ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला पती मरण पावल्याची माहिती दिली नाही. शेवटी माझा भाऊ व दीराने ही माहिती दिली. पती गेल्यानंतर माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले.

आरोपीपैकी एकाचा मृत्यू झाला, तर एक निर्दोष सुटला. उर्वरित आठ जणांना सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, वर्दीतील त्या नराधमांनी कायदा हातात घेऊन मला जिवंतपणी नरकयातना दिल्या.  त्यांना जन्मठेप व्हावी, अशीच माझी अंतिम इच्छा आहे, अशी भावना जरीन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

दुसऱ्या विवाहाचा विचारही केला नाही

वयाच्या १६ व्या वर्षी माझा जॉयसनसोबत विवाह झाला होता. तो गेला त्यावेळी माझे वय २७ वर्षे होते. त्यावेळी मुलगी तनिस्लॉस ही १० वर्षांची तर मुलगा जॉर्ज ९ वर्षांचा होता. इतक्या कमी वयात आपल्यावर दोन मुलांची जबाबदारी आली. दुसरा विवाह केल्यानंतर मुलांचे हाल झाले असते. त्यामुळे नातेवाईकांनी अनेकदा विचारणा केल्यानंतरही मी दुसऱ्या लग्नास नकार दिला, असेही जरीन यांनी सांगितले.

आरोपींकडून धमकी मिळायची

सर्व आरोपी हे पोलीस अधिकारी व कर्मचारी होते. त्यांना वाचवण्यासाठी अनेक गुंड धमकावत होते. शिवाय घटनेची मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. पतीच्या मृत्यूनंतर ताबडतोब आरोपींना अटक करण्यात आली होती. मध्यवर्ती कारागृहातही ओळख परेडदरम्यान त्यांना मी ओळखले होते. मात्र, सत्र न्यायालयात सुनावणीवेळी मला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळायची. त्यामुळे पोलीस विभागाने सुरक्षा पुरवली होती. माझे भाऊ, दीर व वस्तीतील मुले माझ्यासोबत न्यायालयापर्यंत यायचे.