नागपुरातील एक तर इतर शहरांतील दोघांचा समावेश

नागपूर : उपराजधानीत प्रथमच दिवसभरात ३ करोनाबाधितांचा मृत्यू नोंदवला गेला. यापैकी एक रुग्ण धरमपेठ परिसरातील  तर इतर दोघे  जिल्ह्य़ाबाहेरील  होते. त्यामुळे आजपर्यंत येथे दगावणाऱ्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. शहरात दिवसभरात ३५ हून अधिक रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या सुमारे १,९०० झाली आहे.

नागपूरच्या धरमपेठ येथील ७३ वर्षीय वृद्धाला सारीची गंभीर लक्षणे बघत मेडिकलमध्ये ५ जूलैला दाखल करण्यात आले.  त्याला करोना असल्याचे निदान झाले. ७ जुलैच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अमरावती येथील ७१ वर्षीय रुग्ण दोन दिवसांपूर्वी मेयोत दाखल झाला होता. त्याला उच्च रक्तदाब, हृदयविकार होता. सोबतच गंभीर स्वरूपाचा मधुमेह होता.

अशातच  कोरोनाची बाधा झाली. अखेर त्याचा मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला. यानंतर अवघ्या काही तासांत मध्यप्रदेशातील सिवनी येथील ६८ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. त्यालाही करोनाची बाधा असल्याचे चाचणी अहवालातून पुढे आले होते. या रुग्णाला उच्च रक्तदाब, हृदयविकार होता. या तीन नवीन मृत्यूंमुळे शहरातील एकूण बाधितांच्या मृत्यूची संख्या ३० वर पोहचली आहे. यापैकी १२ मृत्यू नागपूर बाहेरचे असून एक मृत्यू अपघातामुळे झाला आहे. पाच जण मेडिकल, मेयोत दगावलेल्या अवस्थेत आले होते.

या भागात बाधित आढळले

हंसापुरी, जुनी मंगळवारी, खामला परिसरात प्रत्येकी दोन बाधित आढळले. मिनीमातानगर, सोमवारीपेठ, दत्तवाडी, आंबेडकर चौक, वडधामना, बेलदारनगर, क्वेटा कॉलनी, कोंढाळी, पोलीस लाईन टाकळीसह इतरही काही भागात दिवसभरात बाधितांची नोंद झाली.

एकाच दिवशी दोन मृत्यू होण्याचे दोन प्रसंग

करोनाबाधितांवर मेडिकल, मेयो आणि एम्स या तिन्ही रुग्णालयांत उपचार सुरू झाल्यापासून दोन दिवस प्रत्येकी दोन रुग्णांचे मृत्यू नोंदवण्यात आले आहे. यापैकी ४ जून रोजी अमरावती आणि मध्यप्रदेशातील दोन व्यक्तींचा तर २६ जून रोजी मोमीनपुरा आणि गोंदियातील एका व्यक्तीचा मृत्यू नोंदवला गेला आहे. शहरातील एम्स रुग्णालयात जोखमीचे रुग्ण घेतले जात नसल्याने अद्याप तेथे एकही मृत्यू नाही, हे विशेष.

‘सारी’चे दोन बळी

मेडिकलच्या कोविड रुग्णालयातील ‘सारी’साठीच्या विशेष वार्डातही मंगळवारी रात्रीपासून बुधवापर्यंत एका ७० वर्षीय महिला आणि ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू नोंदवण्यात आला. दोघांचा चाचणी अहवाल नकारात्मक झाल्याने त्यांची नोंद सारीमध्ये करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

करोनामुक्तांची संख्या चौदाशे पार

मेयो रुग्णालयातून ११ तर मेडिकलमधून ४ अशा एकूण १५ जणांना दिवसभरात करोनामुक्त झाल्याने रुग्णलयातून सुट्टी दिली गेली. त्यामुळे शहरातील आजपर्यंत करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांचीही संख्या चौदाशे (१,४०१) पार गेली आहे.

प्रतिबंधात्मक लसीची मानवी चाचणी लांबणीवर

देशातील  १२ रुग्णालयांसह शहरातील गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात भारत बायोटेक लि. आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या कोव्हॅक्स या करोना प्रतिबंधित लसीची मानवी चाचणी लांबणीवर पडली आहे. यापैकी एम्सच्या दिल्ली आणि पटणातील  संस्थेत तर हैदराबाद आणि इतर एका सरकारी संस्थेत पहिल्या टप्प्यात १३ जुलैपासून तर इतर आठ ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात सुमारे १५ दिवसांत ही चाचणी सुरू होण्याची शक्यता या रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी व्यक्त केली.