* मोमीनपुरातील ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू *  मेयोतील काही रुग्णांचे नातेवाईक विलगीकरणात

नागपूर : मेयो रुग्णालयात उपचाराला आलेल्या ५६ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री मृत्यू झाला. सोमवारी तिला करोना असल्याचे स्पष्ट झाल्यावर  खळबळ उडाली. या रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु तिच्या नातेवाईकांनी चुकीचा पत्ता सांगितल्याने येथील इतर रुग्णांच्या काही नातेवाईकांनाही विलगीकरणात जावे लागणार आहे. उपराजधानीत सलग तीन दिवसांत तीन करोनाचे बळी गेल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

विदर्भातील सहा जिल्ह्य़ांमध्ये कमी-अधिक संख्येने करोनाचे मृत्यू झाले आहेत. पैकी नागपुरात सोमवापर्यंत एकूण सात मृत्यू असले तरी एकूण ३७३ बाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण केवळ १.८७ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी उपराजधानीत सलग तीन दिवसांत तीन मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. पैकी एक ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू सोमवारी मेयोत नोंदवण्यात आला. तिला  रविवारी रात्री छातीत दुखत असल्याने  मेयोत आणले होते. यावेळी ती हंसापुरीतील रहिवासी असल्याची माहिती दिली गेली. त्यामुळे तिला डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. तिला वाचवण्याचे  बरेच प्रयत्न केल्यावरही ती दगावली. अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी तिचे आधार कार्ड तपासले असता ती करोना प्रतिबंधित मोमीनपुरा परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. तिचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले. सोमवारी तिला करोना असल्याचे निदान झाले. ती दाखल असलेल्या अतिदक्षता विभागातील एकूण ८ रुग्णांना इतरत्र हलवून या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.  जवळच्या खाटेवरील रुग्णांचे नमुने तपासण्यासोबतच त्यांच्या संपर्कातील काही नातेवाईकांनाही विलगीकरणात घेतले जाण्याची शक्यता आहे.  रुग्णाला मेयोत घेऊन आलेल्या दोन नातेवाईकांसह इतरांची माहिती घेण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू  असून त्यांना तातडीने विलगीकरण केंद्रात हलवले जाणार आहे.

मोमीनपुऱ्यातील पुन्हा १५० नागरिकांचे विलगीकरण

मोमीनपुरा येथील २२ कुटुंबातील सुमारे १५० नागरिकांचे सोमवारी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. या भागातील एका महिलेचा मृत्यू रविवारी झाला होता. ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घराशेजारच्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले. येथील काही नागरिकांना पाचपावली आणि व्हीआरसी विलगीकरण कक्षात आणण्यात आले.

दोन डॉक्टरांसह एकूण ५ जण विलगीकरणात

महिलेवर उपचार करताना रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या मेयोच्या अतिदक्षता विभागातील दोन डॉक्टरांसह तीन परिचारिकांचे सक्तीचे विलगीकरण करण्यात आले आहे. यामुळे करोनाशी संबंधित कामाचा ताण वाढलेल्या मेयोतील मनुष्यबळ आणखी कमी होईल.

गड्डीगोदाम परिसरात धोका वाढला

उपराजधानीत रविवारी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत गड्डीगोदाम परिसरातील ५ जणांना करोनाची बाधा असल्याचे पुढे आले. त्यामुळे  या भागातही करोनाचा धोका वाढला आहे. येथील मोमीनपुरा परिसरातील ६, अंसारनगर परिसरातील १ नवीन रुग्णांसह इतरही काही रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे.

अंत्यसंस्कारानंतर दोघे विलगीकरणात

नागपूर महापालिका प्रशासनाने मेयोत दगावलेल्या महिलेच्या मृतदेहावर आवश्यक खबरदारी घेत अंत्यसंस्कार केले. मृताच्या दोघा नातेवाईकांना विलगीकरणात घेण्यात आले. त्यांचे नमुने तपासले जाणार आहेत.

दगावलेले रुग्ण व कालावधी

परिसर             तारीख               वय

सतरंजीपुरा     ६ एप्रिल         ६८ पुरुष

मोमीनपुरा       २९ एप्रिल      ७० पुरुष

पार्वतीनगर      ५ मे               २२ पुरुष

पांढराबोळी     २२ मे             २२ पुरुष

गिट्टीखदान     १५ मे             ६५ पुरुष

शांतीनगर       १६ मे             ५४ पुरुष

मोमीनपुरा      १७ मे             ५६ महिला