जागतिक आरोग्य दिन विशेष

उपराजधानीत दहा हजार लहान मुलांचा समावेश; योग्य आहार, व्यायामामुळे नियंत्रण शक्य

उपराजधानीत बदलती जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवयींसह विविध कारणाने मधुमेह आजाराचे रुग्ण वाढत आहेत. एका अहवालात नागपूर शहरात तब्बल ३ लाखांहून जास्त मधुमेहाचे रुग्ण असून त्यात १० हजारांच्या जवळपास लहान मुलांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. योग्य काळजी घेतल्यास हे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात. त्याकरिता नित्याने औषधोपचारासह व्यायाम करण्याची गरज आहे. ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असून त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

नागपूरसह जगभरात मधुमेहाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. आरोग्यास अपायकारक अशी जीवनशैली, शारीरिक व्यायामाचा अभाव व ताण-तणाव ही या आजाराला आमंत्रण देणारी कारणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अहवालानुसार जगात २०१५च्या शेवटपर्यंत जवळपास ४१ कोटी ५० लाख मधुमेहाचे रुग्ण आढळले आहेत. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ अशीच कायम राहिल्यास सन २०४० पर्यंत ही संख्या ६४ कोटी २० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जगभरात प्रत्येक ११ व्यक्तीमागे एकाला मधुमेह होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण पूर्व आशिया खंडातही मधुमेहग्रस्तांची स्थिती गंभीर आहे. येथे ८१ हजार ४०० हून जास्त लहान मुलांना टाईप १ मधुमेह असल्याचे पुढे आले आहे. प्रत्येक वर्षी या संख्येत १३ हजार १०० रुग्णांची भर पडते. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण अमेरिकेत असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशात ७० हजार २००च्या जवळपास लहान मुलांमध्ये मधुमेह टाईप क्रमांक १ आढळतो. तो आशिया खंडात आढळणाऱ्या ८१ हजार ४०० पैकी सर्वाधिक आहे. भारतात मोठय़ा प्रमाणावर मधुमेहाचे रुग्ण आढळत असून ही वाढ अशीच कायम राहिल्यास सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण येत्या काळात भारतात दिसतील. देशात सध्या ६ कोटी ५१ लाख जणांना मधुमेह असून ही संख्या सन २०१० साली ५ कोटी ८ लाख होती. मधुमेह होण्याला येथे वाढणारा लठ्ठपणासह व विविध कारणे जबाबदार आहे.मेडिकलमध्ये २० हजार

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे २० हजार १४६ मधुमेहाच्या रुग्णांची नोंद आहे. त्यातील ५९७ रुग्ण नवीन तर १९ हजार ५४९ रुग्ण हे जुन्या संवर्गातील आहेत. जुन्या संवर्गात ९ हजार ५६६ रुग्ण पुरुष, तर ९ हजार ९८३ रुग्ण महिला संवर्गातील आहेत. नवीन केसेसमध्ये ३०३ रुग्ण पुरुष तर २९० रुग्ण महिला संवर्गातील आहेत. नवीनमध्ये २ महिला व २ पुरुष संवर्गातील लहान मुलांचाही समावेश आहे. एकंदरीत स्थिती बघितली तर नागपुरात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आढळत आहे.

‘रायपुरा’मध्ये ६.५ टक्के रुग्ण

डायबेटीज केयर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वतीने नागपूर जिल्ह्य़ातील हिंगणा तालुक्यातील रायपुरा गावात मधुमेहावर एक सर्वेक्षण करण्यात आले होते. याप्रसंगी १ हजार जणांच्या विविध तपासण्या केल्या गेल्या होत्या. याप्रसंगी तब्बल ६.५ टक्के जणांना हा आजार असल्याचे पुढे आले. नागपूर शहरात त्याहून जास्त रुग्ण असल्याचेही विविध सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

आहार, व्यायामावर लक्ष द्या

बदलती जीवनशैली, ताण-तणाव, व्यायामाकडे दुर्लक्षासह विविध कारणाने नागपूरसह देशात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. प्रत्येकाने या बाबीकडे विशेष लक्ष देत नित्याने व्यायाम केल्यास हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. मधुमेहग्रस्ताने तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य औषधोपचारासह गरज पडल्यास इन्सूलीन घेण्याची गरज आहे. योग्य काळजी घेतल्यास मधुमेहग्रस्तही सामान्य जीवन जगू शकतो, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता व बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

मधुमेह होण्याची कारणे

  •  मधुमेह अनुवांशिक पद्धतीने होऊ शकतो
  •  शाळांचे वाढते तास व तेथे जायला लागणारा वेळ व त्यामुळे विद्यार्थ्यांचे खेळांकडे होणारे दुर्लक्ष
  •  विद्यार्थ्यांसह सामान्यांमध्ये स्पर्धासह विविध कारणाने वाढलेला ताण-तणाव
  •  मैदानी ऐवजी इलेक्ट्रॉनिक (मोबाईल, व्हिडीयो गेम) खेळाकडे वाढता कल
  •  जंगफूड, चिप्ससह वाईट पदार्थ खाण्याच्या सवई
  •  संसर्गित आजाराने मधुमेह नियंत्रित करणाऱ्या ग्रंथींवर परिणाम झाल्यास