• ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या दोन किडनी, यकृताच्या प्रत्यारोपण
  • नेत्रदानामुळे दोघांच्या जीवनात प्रकाश
  • विदर्भात यकृत दानाची दुसरी नोंद

‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या अवयवदानाला विदर्भात प्रतिसाद नाही, परंतु सेवाग्राम-मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सलग दुसऱ्या यकृतसह इतर अवयव दानाची नोंद झाली. येथील चाळिसीतील एका ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या दोन किडनी व यकृताच्या प्रत्यारोपणाने तीन रुग्णांना जीवदान मिळाले. उपराजधानीत यकृत प्रत्यारोपणाची सोय नसल्याने विशेष विमानाने हे अवयव मुंबईला हलवून ही शस्त्रक्रिया झाली. या रुग्णाच्या नेत्रदानानेही दोघांच्या जीवनात बुब्बुळ प्रत्यारोपणाने प्रकाश पडला.

रुग्णालयात ९ जानेवारीला अपघात झालेला ४४ वर्षीय पुरूष गंभीर अवस्थेत उपचाराकरिता आला. डॉक्टरांनी बुधवारी त्याचे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषित केले. यवतमाळच्या गरीब कुटुंबातील हा रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर असल्याने त्याचे अवयव काम करीत होते. रुग्णालय प्रशासनाने तातडीने नातेवाईकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून सांगितले. नातेवाईकांकडून बुधवारी संध्याकाळी ५ वाजता मंजुरी मिळाल्यावर अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क झाला. नागपूरला यकृत प्रत्यारोपण होत नसल्याने मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयाशी त्वरित रात्री संपर्क साधण्यात आला.

मुंबईत यकृताच्या प्रतीक्षेत रुग्ण असल्यामुळे विशेष विमान नागपूरहून मुंबईला अवयव हलवण्याकरिता पोहोचले. दरम्यान या रुग्णाची विनोबा भावे रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांशी किडनी जुळून येत नव्हती. तेव्हा नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालय व केअर रुग्णालयाला किडनी देण्याचा निर्णय झाला. यकृत प्रत्यारोपण केवळ १० तासातच शक्य असल्याने पोलिसांशी संपर्क करून रुग्णवाहिकेला नागपूर विमानतळापर्यंत कुठेही अडथडा होऊ न देता रस्ता मोकळा करून दिला गेला. रुग्णाचे अवयव काढून नागपूरला आणायला केअर रुग्णालयाचे डॉ. अश्विन खांडेकर एका सहकाऱ्यासह गेले होते.

ऑरेंज सिटी रुग्णालयाला किडनी देऊन दुसरी किडनी केअर रुग्णालयात गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास पोहोचली. सकाळी ९.३० पर्यंत दोन्ही रुग्णालयातील शस्त्रक्रिया झाल्या. दरम्यान, त्वरित रुग्णाचे यकृत प्रत्यारोपणाकरिता मुंबईला विशेष विमानाने पाठवले. तेथून ते रुग्णालयात पोहोचताच रुग्णाला प्रत्यारोपीत करण्यात आले. या तिन्ही शस्त्रक्रियेने सगळ्यांना जीवदान मिळाले. सावंगी मेघेतील दोन रुग्णांना या रुग्णाच्या दोन्ही बुब्बुळाचे प्रत्यारोपण झाल्याने त्यांच्या आयुष्यात प्रकाश पडला. हृदय प्रत्यारोपणाकरिता प्रयत्न झाले असले तरी ते चार तासात नागपूरहून मुंबई मार्गे औरंगाबादला पोहचणे शक्य नसल्याने शेवटी हा अवयव निकामी झाला. या शस्त्रक्रियेकरिता डॉ. धनंजय बोकारे, डॉ. रवी देशमुख, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. रोहित गुप्ता यांची भूमिका महत्त्वाची आहे. यकृत प्रत्यारोपणाची विदर्भातील ही दुसरी घटना आहे.

‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयव दानातून अनेकांचे प्राण वाचू शकत असल्याचे दोन अवयव दानाच्या घटनेतून पुढे आले आहे. या अवयव दानाला सगळ्याच शासकीय व खासगी यंत्रणांनी मदत केली. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानाचे महत्त्व समजून पुढाकार घेण्याची गरज आहे.

डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर