* सावत्र पित्याचा तरुणीवर बलात्कार * मेहुण्याकडून महिलेवर महिनाभर अत्याचार

खून, गोळीबार आदी घटनांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना गुरुवारी शहरातील तीन ठिकाणी तीन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांना एकाचवेळी सर्व पातळ्यांवर अपयश येत असल्याची बाब समोर येत असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महासंचालक सतीश माथूर नागपुरात असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

सावत्र पित्याने पाच वर्षांपासून तरुण मुलीवर बलात्कार करून मुलगी आणि वडिलांच्या नात्याला कलंकित करणारी घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद जमील युसूफ वेंडर (५५) असे या नराधम सावत्र पित्याचे नाव आहे. २०१२ पूर्वी पीडित २६ वर्षीय तरुणीच्या आईने दुसरा विवाह केला. तिला एक लहान बहीणही आहे. २२ फेब्रुवारी २०१२ ला घरात कुणीच नसताना आरोपीने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो वारंवार अत्याचार करीत होता.दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह अमरावतीच्या एका तरुणाशी झाला. त्यावेळी तिने आपल्या पतीला सर्व आपबिती सांगून अमरावती येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती तक्रार नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची दुसरी घटना वाडी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. अमित वसंतराव बिडवाईक (२९) रा. नवनीतनगर, वाडी असे आरोपीचे नाव आहे. पीडित २२ वर्षीय मुलगी आणि आरोपी यांची पाच वर्षांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. आता लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

तिसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. जयताळा परिसरातील राहणाऱ्या एका महिलेचे तिच्या नणंदेच्या पतीने आपल्या एका साथीदारासह अपहरण करून तिच्यावर महिनाभर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष रामकृष्ण बिसेन (३५) रा. गोरेगाव, गोंदिया आणि इतर एक अशी आरोपींची नावे आहेत. पीडित २९ वर्षीय महिला ही मूळची गोरेगाव तालुक्यातील रहिवासी असून कामानिमित्त ती पतीसह नागपुरात जयताळा परिसरात राहते. तर तिचा नणंदेचा पतीही नागपुरात राहात असून त्याने २० सप्टेंबरला पीडित महिलेला तिच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर जबरदस्तीने बसवले. यासाठी एका माणसाने त्याला मदत केली. त्यानंतर तो तिला घेऊन मौदा मार्गाने मध्यप्रदेशातील सिवनी येथे गेले. मौदाजवळ संतोषचा मित्र गाडीवरून उतरला. त्यानंतर सिवनीमध्ये एका खोलीमध्ये तिला डांबून ठेवले व तिच्यावर सतत बलात्कार केला. त्यानंतर तो तिला घेऊन भंडारा जिल्ह्य़ातील साकोली येथे पोहोचला. त्या ठिकाणी एका ठिकाणी तिला थांबवले. दरम्यान, तिने संधी साधून पतीला भ्रमणध्वनी केला व त्याला बोलवून घेतले. पतीसह ती परत आली आणि तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.