17 January 2019

News Flash

आईसमोरच चिमुकल्याचा बसखाली येऊन मृत्यू

साई नागराज गोल्हर रा. सेलू, वर्धा असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

चिमुकल्याचा मृत्यूला कारणीभूत ठरलेली बस.

वर्धा मार्गावरील हृदयद्रावक घटना, वाहतूक कोंडीचा बळी

बसची प्रतीक्षा करीत असताना जवळच खेळणारा तीन वर्षांचा मुलगा अचानक एसटी बसच्या खाली आल्याने त्याचा  मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना वर्धामार्गावरील कोकाकोला चौकात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बसस्थानकावरील सर्व प्रवाशी हळहळ व्यक्त करीत होते. साई नागराज गोल्हर रा. सेलू, वर्धा असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

प्रिया नागराज गोल्हर (३५) रा. सेलू या मुलगा साई याला घेऊन आज सकाळी त्यांच्या आईच्या भेटीसाठी नागपूरमध्ये आल्या होत्या.  आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दिवसभर आईसोबत रुग्णालयात वेळ घालवण्यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमारास त्या परत सेलूला जाण्याकरिता कोकाकोला चौकातील बसस्थानकावर उभी होत्या.  त्यावेळी मुलगा त्यांच्या जवळच खेळत होता. दरम्यान नागपूर-चंद्रपूर-राजुरा ही बस आली. प्रवाशी घेऊन निघता असताना साई हा मागील चाकाजवळ उभा होता. गाडी सुटली आणि बसच्या चाकाच्या बाजूला असलेला टिनाचा पत्रा त्याला लागला. तो जमिनीवर कोसळला. हे बघून त्याच्या आईने हंबरडा फोडला. बसस्थानकावरील सर्व प्रवासी धावले. त्याला ताबडतोब जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या अपघातामुळे  वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे परिसरात उभे असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी  चालक खुशिकांत वाघ (३८) रा. राजरा याला ताब्यात घेतले. त्यानंतर नागपूर आगाराला माहिती देऊन बसमधील प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद

या परिसरात मेट्रोचे मोठय़ा प्रमाणात काम सुरू असून संपूर्ण रस्ता अरुंद झाला आहे. या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून वाहनांची गतीही अधिक असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चौकातील खासगी ट्रॅव्हल्सचा थांबा रॅडिशन ब्ल्यू हॉटेलकडे हलवला. तर एसटी महामंडळाच्या बसचा थांबा कोकाकोला चौकात करण्यात आला. त्यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

तर वाचले असते प्राण

साई हा आईच्या कडेवर होता. मात्र,खाली उतरून खेळण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने तीन वेळा खाली उतरून मागितले.व खेळू लागला वारंवार तो रस्त्याच्या दिशेने जात असल्याचे बघून काही सुजान नागरिकांनी त्याच्या आईला सांगितले होते. आईने त्याला दोन ते तीनदा परत आणले. मात्र, त्यानंतरही पुन्हा तो रस्त्याच्या दिशेने गेला व त्याचा अपघाती मृत्यू झाला. आईने थोडीसी अधिक काळजी घेतली असती तर हा अपघात टाळता आला असता.

First Published on February 14, 2018 2:27 am

Web Title: three year old boy killed in st bus accident