News Flash

गुरुवार घातवार

गुरुवार हा नागपूरकरांसाठी घातवार ठरला.

  • सुहासिनी साखरे यांचा अपघाती मृत्यू
  • राजीवनगर, नीलडोहमध्ये दोन महिला ठार
  • विविध अपघातात सहा जणांचा मृत्यू

रस्ते अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून नवनवे उपक्रम राबवले जात असले तरी मृत्यूसंख्येत घट होण्याऐवजी वाढच होत आहे. गुरुवार हा नागपूरकरांसाठी घातवार ठरला असून शहर आणि परिसरात घडलेल्या विविध अपघातात एकूण चार महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात ज्येष्ठ समाजसेविका सीमा साखरे यांची कन्या अ‍ॅड. सुहासिनी यांच्यासह रुग्णालयात जाणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे.

दहेगाव उड्डाण पुलावर झालेल्या कार अपघातात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सीमाताई साखरे यांची कन्या अ‍ॅड. सुहासिनी साखरे (४४) रा. खामला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अ‍ॅड. सुहासिनी या आज सकाळी एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांच्या टाटा नॅनो कारने (एमएच-३१, डीव्ही-७१८०) सावनेर न्यायालयात गेल्या होत्या. तेथील काम संपवून दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूरकडे परत येत असताना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहेगाव उड्डाण पुलावर उभ्या ट्रकला (एमएच-४०, एन-३४५३) त्यांची कार धडकली. वेग अधिक असल्याने कार चेंदामेंदा झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी खापरखेडा पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना नागपूरला हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृम्त घोषित करण्यात आले.

अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक नादुरुस्त होता. चालक मेकॅनिकला आणण्यासाठी गेला होता व ट्रकजवळ क्लिनर उभा होता. मात्र, अपघातानंतर तोही पळून गेल्याचे समजते. परिसरात जोरदार पाऊस सुरू होता आणि ट्रकचे पार्किंग लाईट बंद असल्याने अ‍ॅड. सुहासिनी यांना ट्रक दिसला नसावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

राजीवनगरमध्ये ट्रकच्या धडकेने महिलेचा मृत्यू

रुग्णालयात जात असलेल्या दाम्पत्याला ट्रकने चिरडल्याने पत्नीचा मृत्यू झाला. तर पतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगर परिसरात घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टायर जाळून रस्ता रोको केला. स्वीटी हर्षल लोखंडे (२२) रा वानाडोंगरी असे मृत महिलेचे नाव आहे. पती हर्षल दिलीप लोखंडे हा जखमी आहे. स्वीटीच्या हाताला दुखापत झाल्याने आज दुपारी २ वाजताच्या सुमारास हर्षल पत्नीला घेऊन दुचाकीने (एमएच-४०, एएच-९६१६)रुग्णालयात जात होता. त्यावेळी राजीवनगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून खड्डेही खूप आहेत. खड्डे वाचविताना एका ऑटोरिक्षा चालकाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले व पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात स्वीटी ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली व तिचा मृत्यू झाला.

राजीवनगर बसस्टॉप परिसरात दारूचे दुकान असून त्या ठिकाणी दिवसरात्र दारू पिणाऱ्यांची गर्दी असते. मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला असताना दारू पिणारे रस्त्यावर वाहने उभी करतात आणि त्यामुळे लोकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. या परिस्थितीमुळे हा अपघात झाला, असा आरोप करीत संतप्त नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळून विरोध प्रदर्शन केले. मात्र, वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि लोकांना शांत केले. या प्रकरणात पोलिसांनी ट्रकचालक विजय नारायण बागडे (३२) रा. नरखेड याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

निलडोहमध्ये महिलेला चिरडले

राजीवनगर परिसरातील अपघाताला एक तास होत नाही, तोच काही अंतरावर निलडोह परिसरात दुसरा अपघात झाला. दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास पुष्पा पंढरी बकलकर (५२) रा. निलडोह वस्ती या रस्ता ओलांडत असताना ट्रकने (सीजी-०४, जेडी-७९९२) धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ४ सप्टेबरला अपघातात जखमी झालेल्या जमीला रहीम शेख (५०) रा. कळमना वस्ती याचा आज रुग्णालयात मृत्यू झाला. आणखी एक अपघात गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. सुदर्शन बाबुराव चावके (४०) रा. जयताळा हे बमुधवारी रात्री १० वाजता आपल्या एमएच-४०, के-४२५९ क्रमांकाच्या दुचाकीने मेयो रुग्णालयाकडून सीताबर्डीकडे जात असताना एमपी-२०, पीए-०९८५ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालक रविशंकर शेषराम गडरवार (२९) रा. किडराई, जि. सिवनी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा मृत्यू

ट्रकच्या अपघातात पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाला. किशोर केशवराव इंगोले (४०) रा. पोलीस लाईन टाकळी असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी प्रतिभा या अंबाझरी पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. किशोर हे गुरुवारी सकाळी आपल्या एमएच-४०, के-९८८९ क्रमांकाच्या दुचाकीने कामानिमित्त कामठी येथे नातेवाईकाकडे गेले होते. १० वाजताच्या सुमारास ते परत येत असताना मानकापूर रिंग रोडवर अवस्थीनगर चौकात एमएच-३१, ४३७१ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ट्रकचालक पडून गेला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना उपचाराकरिता एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2017 2:57 am

Web Title: thursday accident in nagpur
Next Stories
1 सुपारी गोदामांवर महसूल गुप्तचर संचालनालयाचे छापे
2 बंद शाळेवर मत्स्य विक्रेत्यांचा अवैध ताबा
3 पाल्यांच्या सुरक्षेबाबत पालकांची सीबीएसई शाळांना विचारणा
Just Now!
X