नागपूर : चंद्रपूर जिल्ह्य़ात धुमाकूळ घालणाऱ्या एक वाघ आणि दोन वाघिणींना बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिले आहेत.

चंद्रपूर शहरात इरई धरण आणि माना टेकडीजवळ गेल्या काही दिवसांपासून एक वाघ आणि वाघिणीचे वास्तव्य आहे. शहरातील नागरिकांना नेहमी त्यांचे दर्शन होत असल्याने ते भयभित आहेत. अद्याप मानव-वन्यजीव संघर्ष झालेला नसला तरीही शहराच्या जवळ वाघांचा वाढत असलेला वावर पाहता मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे वाघांना बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी रात्री या दोन वाघांसह ब्रम्हपुरी परिसरातील नागभीड विभागातील एका वाघिणीला पकडण्याचे आदेशही देण्यात आले आहे. ही वाघीण गेल्या काही दिवसांपासून शेतात फिरत आहे. तिच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यूदेखील झाला आहे.

त्यानंतर राजुरा येथील वाघाला पकडण्यासाठीही आदेश देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, अजूनपर्यंत त्या वाघाला पकडण्याचे आदेश मिळायचे आहेत. दरम्यान पावसामुळे वाघांना पकडण्याच्या या मोहिमेत अडथळा येण्याची शक्यता आहे. पावसात किंवा ओलिताच्या परिसरात वाघांना किंवा इतर वन्यप्राण्यांना बेशुद्ध करता येत नाही. त्यामुळे उद्या वातावरण चांगले राहिल्यास या तिन्ही वाघांना पकडण्याची मोहीम सुरू केली जाऊ शकते.