तब्बल १०० ते १२० किलोमीटर अंतर पार करून वाघाचे स्थलांतरण

अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यान्हात आढळलेला वाघ, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील असल्याचे सिद्ध झाले आहे. वाघाने तब्बल १०० ते १२० किलोमीटरचे अंतर पार करून स्थलांतरण केले आहे. कळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलात ‘नवाब’ या नावाने परिचित हा वाघ आता पोहरा-मालखेडच्या जंगलाचा ‘राजा’ झाला आहे.

पोहरा-मालखेडच्या जंगलात बऱ्याच वर्षांंनी वाघाचे अस्तित्त्व आढळल्याचे वृत्त लोकसत्ताने गुरुवारला प्रकाशित केले. या वृत्तानंतर पोहरा ते कळमेश्वरच्या संचारमार्गाची संलग्नता लक्षात घेता अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेली वाघाची छायाचित्रे पाठवली. ही छायाचित्र आणि कळमेश्वर-कोंढाळीतील वाघाचे छायाचित्र जुळले. अवघ्या एका दिवसात हा वाघ म्हणजेच, कातलाबोडीच्या विहिरीत पडलेल्या वाघिणीचा बछडा असल्याचे युवा संशोधक धनुषा कावलकर यांनी केलेल्या चाचणीनंतर सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वीच याच वाघिणीचा मोठा बछडा बोर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करून गेल्याचे सिद्ध झाले होते. कळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलात पूर्ण वाढ झाल्यानंतर वाघ त्याच्या नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडल्याचे सिद्ध झाले आहे. २ वर्षे ६ महिने वयाच्या ‘नवाब’चे वर्तन त्याच्या नावाला शोभेलसेच आहे. कातलाबोडीच्या वाघिणीला ‘शिवानी’ आणि ‘भवानी’ नावाचे आणखी दोन मादा बछडे असून ‘नवाब’ने आतापर्यंत त्यांच्यासोबत आपला अधिवास शेअर केला होता. वाघ त्यांचा अधिवास शेअर करत नसले तरीही हे तीनही वाघ एकत्र शिकार करत होते.

राखीव जंगलाच्या योग्य व्यवस्थापनाचा परिणाम -हाते

कातलाबोडी येथे एका विहिरीत पडलेल्या वाघिणीला राखीव जंगलात सोडण्याचा प्रयोग करण्यात आला. तेथे तिला अतिशय पोषक वातावरण मिळाले आणि त्यामुळे तिने अनेक बछडय़ांना जन्म दिला. त्यातील दोघांची पूर्ण वाढ झाल्यावर ते नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडले. एका राखीव जंगलाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले, तर त्याचे अतिशय चांगले परिणाम मिळू शकतात. कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील वाघाचे स्थलांतरण हे त्याचेच उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली.