महामार्गावर दरवर्षी किमान २०-२५ वन्यप्राणी मृत्युमुखी

कोहमारा आणि देवरीच्या मध्ये देवपायलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अडीच ते तीन वर्षांच्या बिबटचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ऑक्टोबर २०१७ मध्ये याच राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू झाला होता.

दोन जंगलांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग नाही. त्यामुळे नवेगाव- नागझिरा व्याघ्रप्रकल्पालगतच्या या राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी किमान २०-२५ वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. पाच-सहा महिन्यांपूर्वी मसूलकसा घाटावर बिबट मृत्युमुखी पडला होता, तर शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण बिबटय़ाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात बिबटय़ाला आतून रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले, तर त्याचा मागील पायाला फ्रॅक्चर होते. शवविच्छेदनानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, वनपाल तसेच इतर कर्मचारी व माजी मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर उपस्थित होते.

दोन-तीन दिवसांपूर्वी पेट्रोलिंग करताना वनरक्षकांना महामार्गलगतच्या जंगलात हा बिबट फिरताना दिसून आला. सध्या नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या कॉरिडॉरमध्ये आगीचे तांडव सुरू आहे. तसेच या व्याघ्रप्रकल्पात पाणवठे देखील कोरडे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी पाण्याअभावी माकडांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आगीपासून बचावाकरिता आणि पाण्याच्या शोधात बिबट बाहेर आला आणि वाहनाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला असावा.