व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा अतिउत्साह वाघांच्याच नव्हे, तर पर्यटकांच्याही जीवावर कसा बेतू शकतो, याचा प्रत्यय उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नुकताच आला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापाठोपाठ आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील व्याघ्रदर्शन पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, व्याघ्रदर्शनाचा अतिउत्साह अंगावर बेतण्याचा प्रकार या अभयारण्यात घडला आणि पुन्हा व्याघ्रदर्शन व त्यासाठी होणाऱ्या पर्यटनावर वनखात्याला विचार करण्याची वेळ आली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणाऱ्या व्याघ्रदर्शनाने देशविदेशातील पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यास भाग पाडले. व्याघ्र प्रकल्पासाठी ही बाब अभिमानाची असली तरीही व्यवस्थापनाचा त्यावर अंकुश असावा किंवा नाही, याचा कुणीही विचार केला नाही. या व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील पर्यटनाला बहार आला आणि वनखात्यानेही वाघांच्या संरक्षणावर नव्हे, तर पर्यटनावर अधिक भर दिला. त्याचे दुष्परिणाम सरत्या वर्षांच्या शेवटी आणि नव्या वर्षांच्या सुरुवातीला वनखात्याने अनुभवले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची वाढ ही वाघाला शेळी बनवणार की काय, या पायरीपर्यंत आली आहे. सर्रासपणे पर्यटकांनी भरलेल्या जिप्सी वाघांच्या जवळ जाऊन उभ्या राहतात आणि वाघ मुकाटय़ाने निघून जातो. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातसुद्धा आता हा प्रकार घडायला लागला असून त्याची अनुभूती अलीकडेच पर्यटकांनी घेतली. यावेळी पर्यटकांचे नशीब बलवत्तर म्हणून वाघ मुकाटय़ाने निघून गेला. त्यावेळी वाघाने खऱ्या अर्थाने त्याची ओळख दाखवली असती, तर कदाचित पर्यटकांचा अनुभवलेला रोमांच चित्रफितीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा पाहता आला नसता. या अभयारण्यात वाघाने तब्बल काही मिनिटे जिप्सीजवळ ठाण मांडले. जिप्सीतील पर्यटकांचा गंध घेण्यापासून, तर जिप्सीच्या आरशाशी खेळण्याचा प्रकारही त्याने केला. जिप्सीचालकासह सर्व पर्यटकांचे श्वास त्याने काही मिनिटे रोखून धरले होते. मात्र, या प्रकाराने पुन्हा अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावर विचार करण्याची वेळ वनखात्यावर आली आहे. अलीकडच्या काही वर्षांत वनखाते पूर्णपणे पर्यटन आणि त्यासंदर्भातील बाबींवरच योजना आखण्यात व्यस्त आहे. जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी त्यांना काहीही देणेघेणे नसल्यागत अवस्था अलीकडच्या काळात उद्भवली आहे. एकेकाळी मध्यप्रदेश वनखात्याने याच कारणामुळे वाघ पूर्णपणे गमावले होते. त्यामुळे या अतिपर्यटनाला वेळीच आवर घातला नाही, तर तीच वेळ महाराष्ट्रावरसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी महाराष्ट्रातील जंगल पर्यटनाचा अतिउत्साह वाघ आणि इतर वन्यजीवांवरच बेतत आहे. वाघांचे संशयास्पद होणारे मृत्यू, त्यामुळे बछडय़ांचे दुरावणे आणि मग त्यांचाही मृत्यू, असा क्रम नुकताच वनखात्याने अनुभवला आहे.