18 February 2020

News Flash

‘साहेबराव’ वाघावरील शस्त्रक्रियेचा प्रसिद्धीसाठी वापर!

मुक्या जीवाशी खेळण्याच्या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींचा संताप

शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतरचा ‘साहेबराव’.

अनेक नियम पायदळी तुडवले; मुक्या जीवाशी खेळण्याच्या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींचा संताप

नागपूर : वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची एकमधील वन्यप्राण्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे आणि त्यांना हाताळण्याचे अधिकार केवळ पशुवैद्यक अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, गोरेवाडा बचाव केंद्रातील ‘साहेबराव’ या वाघाला कृत्रिम पाय लावताना  अनेक नियम पायदळी तुडवण्यात आले. प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्याची समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी एकवेळ मान्य, पण ते होण्याआधीच प्रयत्नांचा गवगवा करण्यात आल्याने प्रसिद्धीसाठी या मुक्या जीवाशी खेळ का खेळला गेला, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

दीड वर्षांपूर्वी डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी पायाची बोटे गमावलेल्या या वाघाला एक वर्षांसाठी दत्तक घेतले होते. त्यांनीच या वाघाच्या पायाला असणारा त्रास लक्षात घेऊन कृत्रिम पाय बसवण्याचा मानस व्यक्त केला.  गोरेवाडा प्रशासनाने त्यासाठी लेखी परवानगी दिली. त्यानंतर डॉ. बाभूळकर यांच्या सूचना अंमलात आणून ही संपूर्ण प्रक्रिया पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी पार पाडायला हवी होती. मात्र, प्रशासनाने संपूर्ण सुत्रेच डॉ. बाभूळकर यांच्या हातात सोपवली. पशुवैद्यक अधिकाऱ्यांवर केवळ त्या वाघाला भूल देणे एवढीच जबाबदारी बाकी ठेवली. काही वर्षांपूर्वी वाघाच्या बछडय़ाच्या पायात रॉड बसवण्याचे, दिल्लीहून विमानाने वाघाचे रक्त बोलावून ते महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघाला देण्यासारखे यशस्वी प्रयोग नागपुरातील याच पशुवैद्यकांनी यशस्वी केले आहेत, याचा विसर गोरेवाडा प्रशासनाला पडला. ‘साहेबराव’च्या शस्त्रक्रियेत अनेक नियमांचे पालन करण्यात आले नाही, अशी चर्चा आहे. तो माणूस नाही, प्राणी आहे हे प्रशासनाला कसे लक्षात आले नाही? भूल उतरल्यावर तो कसा प्रतिसाद देईल, हे केवळ पशुवैद्यकांनाच कळते आणि त्यानुसारच ते वन्यप्राणी हाताळत असतात. येथे मात्र विदेशातील पशुवैद्यक डॉ. पीटर, डॉ. बाभूळकर व त्यांचे सहकारी मोर्चा सांभाळत होते. वन्यप्राण्यावर उपचार होत असताना संबंधित पशुवैद्यक आणि त्यांचे सहाय्यक असे मोजकेच लोक त्याठिकाणी असावे असा नियम सांगतो. ‘साहेबराव’च्या प्रकरणात मात्र गोरेवाडय़ाच्या तीन पशुवैद्यकांसह डॉ. पीटर, डॉ. बाभूळकर आणि त्यांचे पाच सहकारी आणि एवढेच नाही तर माहितीपट तयार करणारे तीन असे सुमारे १५ जण त्याठिकाणी होते. शस्त्रक्रिया सुरू असताना भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्याचे फ्लॅश, चलचित्रण सर्रास केले जात होते. भूल उतरली असती आणि यादरम्यान काही घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

प्रसारमाध्यमांसाठीच नियमावली!

एकीकडे प्रसारमाध्यमांना नियमावली शिकवली जाते आणि दुसरीकडे अधिसूची एकमधील वन्यप्राणी हाताळत असताना विदेशातील लोकांना माहितीपट तयार करण्याची परवानगी दिली जाते. यावेळी प्रशासनाचे नियम कुठे जातात, असा प्रश्न  उपस्थित केला असता वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामबाबू यांनी या प्रयत्नांचे चलचित्रीकरण सोमवारी प्रसारमाध्यमांना देण्यात येतील. आमच्या परवानगीशिवाय ते बाहेर जाणार नाही, असे सांगितले. प्रत्यक्षात शनिवारीच डॉ. सुश्रूत बाभूळकर तसेच एका संकेतस्थळावर चलचित्रफिती प्रसारित करण्यात आल्या.

आपण फक्त मानवाची नाही तर पशुप्रेमींचीही काळजी करतो. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप थांबवून सर्वानी एकत्र यायला हवे. गेल्या सहा महिन्यांपासून पायाच्या दुखण्यामुळे हा वाघ रडत होता, हे त्याच्याजवळ असणाऱ्या कुणाला कळले नाही. त्याच्या वेदना कमी करण्याचा आम्ही एक प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांचा वनखात्यावर राग आहे आणि त्यांनी तो दुसऱ्या ठिकाणी काढावा.

– डॉ. सुश्रूत बाभूळकर, अस्थिरोगतज्ज्ञ

First Published on January 22, 2020 3:43 am

Web Title: tiger surgery use for publicity zws 70
Next Stories
1 आयुक्तपदी मुंढे यांच्या नियुक्तीचे गटनेत्यांकडून स्वागत
2 वीज कापणाऱ्या कर्मचाऱ्याला खांबावर रोखून धरले
3 वरातीत नाचण्याच्या वादातून खून
Just Now!
X