दहशतवादी संघटनांकडून सणासुदीच्या काळात देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब ठेवणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्याने नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक रेल्वेगाडीची कसून तपासणी केली जात आहे.

नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सी (एआयए)ला बॉम्ब ठेवण्यासंदर्भात माहिती मिळाली आहे. त्यामुळे देशभर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर रेल्वेस्थानक अतिसंवेदनशील असल्याने येथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. येथून देशातील सर्व प्रमुख शहरांकडे गाडय़ांची ये-जा आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने गस्त वाढवली आहे. श्वान आणि बॉम्बशोधक पथक यांच्याकडून तपासणी केली जात आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेतून संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा दलाने सुमारे २० रेल्वेगाडय़ांची तपासणी केली. सोमवारी दिवसा आणि रात्री तपासणी सुरू होती.

नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १२५ ते १४० रेल्वेगाडय़ा तसेच ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला देशात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची सूचना मिळाली आहे. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.