काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वक्तव्य

पांढरकवडय़ातील टी-१ वाघिणीला ठार मारल्यावर त्याविरोधात वन्यजीवप्रेमी ओरड करीत असले तरी  त्या वाघिणीपासून असणारा धोका लक्षात घेता तिला यापूर्वीच मारायला पाहिजे होते. तसे झाले असते तर १३ बळी गेले नसते, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांनी व्यक्त केले आहे.

वाघिणीने राळेगाव, केळापूर, कळंब या तीन तालुक्यात धुमाकूळ घातला. वर्षभरात १३ जणांचा बळी घेतला. तब्बल दोन वर्षांनंतर तिला ठार मारले, पण वन्यजीवप्रेमींनी या निर्णयाविरोधात देशभर ओरड सुरू  केली आहे. वनमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरले जात आहेत. दरम्यान, राळेगाव तसेच केळापूर-आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघाचे प्रा. वसंत पुरके आणि अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी  वाघिणीला ठार मारण्याचे समर्थन केले  आहे. वनखात्याने या वाघिणीला पकडण्यासाठी खूप संयम बाळगला, पण ती टप्प्यात येत नव्हती. जनतेचा जीव महत्त्वाचा असल्याने वनखात्याचाही नाईलाज होता, असे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे. वाघिणीने पहिली शिकार केल्यानंतरच तिला वनखात्याने लगेच पावले उचलून बेशुद्ध करायला हवे होते, पण  त्याकडे दुर्लक्ष झाले. या परिसरात हजारो एकर शेती पडीक असल्यामुळे तिचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. वाघिणीच्या मृत्यूवर ओरड करण्यापेक्षा वन्यजीवप्रेमींनी प्रत्यक्ष या भागाला भेट दिली असती तर त्यांना वास्तव कळले असते, असे प्रा. वसंत पुरके यांनी म्हटले आहे.

दिल्ली, मुंबईत बसलेल्या वन्यजीवप्रेमींनी वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेत याचिका व अन्य माध्यमातून अडथळे आणले. आजही ही मंडळी वनखात्यावर तोंडसुख घेत आहे. मनेका गांधी यांनाही चुकीची माहिती दिली जात आहे, अशी टीका वसंतराव नाईक  शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यापूर्वी केली होती.