मधुमेहग्रस्तांना सावधगिरीचा इशारा
रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. त्यात बहुतांश मुस्लिम बांधव अन्नपाणी तसेच डोळ्यात टाकण्याचे ड्रॉप्सही संध्याकाळपर्यंत वर्ज करतात. अभ्यासावरून असे पुढे आले की, जगात ४ ते ५ कोटी मधुमेहग्रस्त मुस्लिम बांधवही या काळात रोजा (उपवास) ठेवतात. अशांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यांनी रमजानमध्ये विशेष काळजी घेतल्यास हे धोके टाळणे शक्य आहे.
जगात सुमारे १०० कोटी मुस्लिम आहेत. त्यातील १८ कोटी भारतात राहतात. या लोकसंख्येत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. त्यानुसार संध्याकाळपर्यंत ते पाणीही प्राशन करीत नाही, त्यामुळे या काळात मधुमेहग्रस्तांमध्ये मात्र वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. वैद्यक अभ्यासानुसार मधुमेहग्रस्तांमध्ये इन्सुलिन व रक्तातील साखरेचा समन्वय बिघडल्यामुळे जास्त गुंतागुंत होऊ शकते. रक्तशर्करा कमी होण्याचा धोका ४ ते ८ वेळा आणि वाढण्याचा धोका ३ ते ५ वेळा असतो. मधुमेहग्रस्तांनी पाणी कमी प्यायल्यामुळे त्रास वाढतो. ती टाळण्यासाठी त्यांनी वैद्यकीय तपासणी करण्याची, तसेच त्यांना रक्तशर्करेची तपासणी आणि इन्सुलिनच्या इन्जेक्शनमुळे उपवासात बाधा येत नसल्याचे समजावून सांगण्याची गरज आहे.
रक्तशर्करेची तपासणी उपवासाच्या २ ते ४ तासानंतर, तसेच उपवासादरम्यान काही वेळा करावयास हवी. त्यात रक्तशर्करा ६० एमजी/डीआयपेक्षा कमी किंवा ३०० एमजी/डीआयपेक्षा जास्त होताच उपवास सोडावा. तसे न केल्यास मेंदू, डोळे, किडनीला कायमचा अपघातही होऊ शकतो. या रुग्णांची रक्तशर्करा कमी-जास्त झाल्यास भोवळ येणे, डोळ्यासमोर काळोख येणे, घाम येणे, कमी दिसण्यासह इतर लक्षणे समजावून सांगून त्वरित घ्यावयाच्या काळजीबाबतही माहिती देण्याची गरज आहे.

रमजानमध्ये अनियंत्रित मधुमेहींनी शक्यतो उपवास टाळावा. नियंत्रित मधुमेह असलेल्यांनी उपवास केल्यास हरकत नसून प्रत्येकाने विशेष काळजी मात्र घेण्याची गरज आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रात्रीचा मधुमेहाच्या औषधांचा डोस वाढवून सकाळचा कमी करावा. लठ्ठ असलेल्या रुग्णांनी सतत तीस दिवस उपवास केल्यास त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे या व्यक्तीला भविष्यातील औषधे कमी घेण्यासह इतरही शारीरिक त्रास कमी होतो.
डॉ. रफत खान, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर</strong>

रमजानमध्ये मधुमेहग्रस्तांनी शक्य असल्यास उपवास टाळावे. ते शक्यच नसल्यास रक्तशर्करा वारंवार तपासून इन्सुलिनची मात्रा बदलावी. गोळ्यांवर रक्तशर्करा नियंत्रण शक्य असल्यास जेवणानुसार त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बदलावे. संध्याकाळी उपवास सोडतांना दूध, खजूर, तळलेले पदार्थ व गोडपदार्थ टाळावे. कारण, त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते. मधुमेहग्रस्तांनी रात्री २ ते ३ वेळेस थोडे थोडे खावे. जेवण्यात ५ फळे खावी. गहू, दाळ, बदाम, हिरव्या पालेभाज्यांसह चहामुळे शरिरातील पाणी कमी होत असल्याने ते कमी घ्यावे. दिवसा शारीरिक श्रम कमी करण्यासह उपवास सोडल्यास काही खाल्यानंतर दोन तासानंतर व्यायाम करावा. ही काळजी घेतल्यास जगातील ५ कोटी मुस्लिम बांधवांची संभाव्य गुंतागुंत टाळणे शक्य आहे.
डॉ. अशोक मदान, नेत्र विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर

धोका होणाऱ्या व्यक्ती कोण?
’ वारंवार रक्तशर्करा कमी-जास्त होणारे रुग्ण.
’ मधुमेही टाईप-१ चे रुग्ण.
’ खूप जास्त शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती.
’ वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्ती.
’ डायलिसीसवर असलेले रुग्ण.
’ गर्भवती माता.