सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशनची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट 

शहराचा नकाशाच बिघडला आहे. कोणत्याही भागात जा फुटपाथवरील अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग, स्वच्छता या प्रमुख समस्या अगदी ठळकपणे नजरेस पडतात. या समस्या सोडवून शहराला शिस्त लावण्याची जबाबदारी  महापालिका आणि पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, अनेकदा राजकीय दबावामुळे या यंत्रणा पुढे पाऊल टाकत नाहीत. हा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला. त्यामुळे आम्ही धरमपेठ भागातील  युवकांनी  प्रशासनाच्या पुढाकाराची वाट न पाहता परिसरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कार्य सुरू केले. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. या पुढच्या टप्प्यात आम्ही या अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दात कॅग फाऊंडेशन (सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशन) संस्थेचे पदाधिकारी विवेक रानडे, गिरीश वझलवार, प्रशांत भूत आणि नितीन साठे यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. ते म्हणाले, दीड वर्षांपूर्वी कॅग फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. प्रशासनाची मदत घेण्यासाठी महापालिका आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

परिसरातील लोक जुळले आणि आज स्वच्छता, अतिक्रमणाबाबत  लोकांच्या मानसिकतेमध्ये आणि परिसरात बदल दिसू लागला आहे. धरमपेठ भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या भागातच सहा वेगवेगळे विभाग केले आणि प्रत्येक भागात २० ते २५ कार्यकर्त्यांची चमू तयार केली. त्यामुळे ज्या ठिकाणी काम असेल त्या ठिकाणी त्या त्या भागातील कार्यकर्ते निरोप मिळाल्यावर पोहोचतात आणि एकत्रितपणे काम करत परिसर स्वच्छता करतात. आतापर्यंत सहापैकी चार ठिकाणी असलेले कचराघर बंद झाले.

शहरातील फुटपाथ महापालिकेने मोकळे करण्याची गरज आहे. विशेषत: धरमपेठ, लक्ष्मीभवन, वेस्ट हायकोर्ट मार्गावर फुटपाथची समस्या आजही कायम आहे. त्या ठिकाणी सध्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते चांगले करताना या भागातील फुटपाथ मोकळे करायला हवे, याकडेही या मंडळींनी लक्ष वेधले.

अन् लोकांनी कचरा टाकणे बंद केले

धरमपेठ आणि लक्ष्मीभवन परिसरात अनेक अपार्टमेंट आहेत. यातील काही लोक मिळेल त्या मोकळ्या जागेवर कचरा टाकत असतात. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा कचरा उचलणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडील कचरा असतो त्यांचे नाव असलेला एखादा पुरावा त्या कचऱ्यात सापडतो. आम्ही तो शोधून काढतो आणि तो टाकलेला कचरा ज्यांचा आहे, त्यांच्याकडे नेऊन देतो. अनेकदा  ते हा आमचा कचरा नसल्याचे सांगतात. मग त्यांना आम्ही पुरावा देतो. त्यानंतर मात्र ते घरात डब्यामध्ये कचरा जमा करतात. हा बदल आता अनेक सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये दिसू लागला आहे.

 महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उदासीन

स्वच्छतेबाबत धरमपेठ आणि लक्ष्मीभवन परिसरात काम सुरू केल्यावर स्वच्छतेसाठी धरमपेठ झोनला साहित्य मागितले होते. मात्र, त्यांनी पाठवले नाही. त्यामुळे संस्थेने आता स्वखर्चाने फावडे, टोपले, झाडू आदी साहित्य खरेदी केले. त्यामुळे महापालिकेकडे साहित्य मागण्याची गरज उरली नाही. कचरा उचलण्यासाठी अनेकदा गाडीची मागणी केली जाते. मात्र, ती सुद्धा अनेकदा वेळेवर येत नाही. महापालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी आहेत. पण, समस्या सोडवण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे जनतेलाच समोर यावे लागत आहे.

‘त्या’ कलाकृती आम्हाला द्या

महापालिकेने चौक सौंदर्यीकरण स्पर्धा घेतली आणि त्यासाठी ५० लाख रुपये मंजूर केले. या स्पर्धेसाठी अनेक वास्तू विशारद आणि शिल्पकारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अनेक चांगल्या कलाकृती त्यावेळी महापालिकेला प्राप्त झाल्या. यातल्या काही कलाकृती धुळीने माखून खराब झाल्या. महापालिकेने त्या आम्हाला दिल्या तर धरमपेठ पसिररात वेगवेगळ्या ठिकाणी लावून सौंदर्यीकरण करू.

ट्रॅफिक पार्कमध्ये खाद्यपदार्थाच्या दालनाला विरोध

ट्रॅफिक पार्कमध्ये खाद्यपदार्थ विकू नये, यासाठी आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, ते बंद होत नव्हते. त्यामुळे संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. आता या ठिकाणी खाद्यपदार्थाचे दालन सुरू करण्याचा विचार आहे. त्याला आमचा विरोध आहे. ट्रॅफिक पार्कमध्ये एक माणूस अक्रोड विकत होता. त्याला आम्ही रोखले. त्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकांशी वादावादी करीत एका राजकीय नेत्याला फोन लावला. चूक त्या विक्रेत्याची होती तरीही त्या राजकीय व्यक्तीने सुरक्षा रक्षकाच्या मालकाला सांगून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. हे असेच चालत राहिले तर शहराला शिस्त कशी लागणार, असा प्रश्नही विवेक रानडे, गिरीश वझलवार, प्रशांत भूत आणि नितीन साठे यांनी उपस्थित केला.