देशाच्या सीमेवर तसेच देशांतर्गतही लष्करी जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशवासीयांची प्राणपणाने सेवा करीत असतो अशा जवानांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते, असे प्रतिपदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते गुरुवारी रामगिरीवर झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-२०१५ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कर्नल जतकर यांनी फडणवीस यांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ केला. सीमेवर शौर्य दाखविलेले एअर कमोडोर सूर्यकांत चाफेकर, कमांडर कौस्तुभ गोसावी, कर्नल मीलन नतवडे, ले. कर्नल विनोदकुमार रापे, सुभेदार साहेबराव लवटे, शिपाई सचिन पाटील, नायक लक्ष्मण पाटील, शिवानंद घाले यांच्यासह दिवंगत अविनाश सोमवंशी यांच्या वीर पत्नी सोनाली, वीरपिता यशवंत सोमवंशी, वीर पत्नी भारती योगेश दराडे, वीर पिता दिनकर दराडे, वीर माता कावेरी दराडे, दिवंगत सुभेदार एस.व्ही.आर कृष्णमूर्ती यांच्या वीरपत्नी मंगला मूर्ती यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नितीन पांडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शूर सैनिकांच्या बलिदानाचे मोल अशा गौरव कार्यक्रमाने ठरू शकत नाही. तरीही सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आदर दाखविण्यासाठी अभिमान व्यक्त करणे आवश्यक ठरते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला सैनिक कल्याण विभागाचे माजी संचालक कर्नल (निवृत्त) सुहास जतकर, मिलिंद तुंगार यांच्यासह इतरही वरिठ अधिकारी उपस्थित होते.