05 August 2020

News Flash

शहरातील ‘वॉटर एटीएम’मध्ये कॅनचा ठणठणाट

काही एटीएमच्या शेजारी शौचालय तर काही एटीएमच्या बाजूला अस्वच्छता असल्याने दुर्गंधी पसरली आहे

केंद्राजवळच शौचालय,अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

नागपूर : नागरिकांना स्वस्त, शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने शहरात ‘वॉटर एटीएम’ची संकल्पना पुढे आली आहे. अनेक भागात असे एटीएम सुरू करून २५ पैसे प्रतिलिटर शुद्ध पाणी देण्यात येत आहे. मात्र पूर्वी पाणी घेऊन जाण्यासाठी देण्यात येणाऱ्या पांढऱ्या कॅन देणे बंद करण्यात आले आहे. शिवाय या वॉटर एटीएम केंद्रांजवळ शौचालयच असल्याने दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दरवर्षी उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने पाण्यासाठी भटकावे लागते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी शहरात पाण्याचे एटीएमची संकल्पना राबवण्यात आली असून पंधरा नवे पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. यातून ग्राहकांना थंडगार शुद्ध पाणी अल्पदरात देण्यात येते. शहरातील नागरिकांना सध्या काही प्रमाणात शुद्ध पाणी मिळत असले तरी शहरालागतच्या भागात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना मिळणारे पिण्याच्या पाण्याचे स्रोत एकतर बोअर नाहीतर विहीर असून या पाण्यामध्ये क्षारामुळे जडपण येत आहे. तसेच काही भागात जमिनी खालच्या पाण्यात कमी प्रमाणात आवश्यक असलेले घन पदार्थ मुख्यत: कॅल्शिअम काबरेनेट, मॅग्नेशिअम सल्फेट यासारखे क्षार कमी जास्त प्रमाणात आढळतात. मात्र हे घन पदार्थ मानवाला आवश्यकही असतात परंतु प्रमाणात. तसेच काही ठिकाणी खारट पाण्याचे प्रमाणही अधिक असते. अशा पाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून शहरात वॉटर एटीएम सुरू करण्यात आले. अंदाजे आठ ते दहा लाख रुपये एक वॉटर एटीएम उभारण्यासाठी लागतात. शहरातील वॉटर एटीएम महाजनको, भारत हेवी इलेक्ट्रीक्स अशा मोठय़ा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून खर्च करण्यात आले.

हे वॉटर एटीएम सुरू करताना पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक अल्ट्रा फिल्टरेशन, ओझोनायझेशन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. स्टोरेज युनिटमध्ये एकदा पाणी पडल्यास नागरिक कार्ड स्वाईप करून सहज शुद्ध पाणी (मिनरल वॉटर) मिळते, असा दावा करण्यात आला होता. नागरिकांना २० लिटर पाण्याची कॅन देण्यात येईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. एटीएम सुरू झाल्यावर काही महिने पाण्याचे कॅनही देण्यात आले.मात्र आता हे कॅन देणे बंद केले असून त्यासाठी  नागरिकांना स्वत:च्या कॅन किंवा भाडय़ाने कॅन घ्याव्या लागत आहे.  वॉटर कॉर्डच्या माध्यमातून कार्ड स्वाईप करून पाणी मिळवता येते. मात्र कार्डमध्ये पैसे भरून रिचार्ज करणे आवश्यक आहे. काही एटीएमच्या शेजारी शौचालय तर काही एटीएमच्या बाजूला अस्वच्छता असल्याने दुर्गंधी पसरली आहे. जयताळा येथील वॉटर एटीएममध्ये  प्लास्टिकचे कॅन ठेवण्यात आले असून पाण्याची नियमित तपासणी अथवा दर्जा पाहणी किंवा स्वच्छते संदर्भात कुठेही फलक लावण्यात आलेले नाही.त्यामुळे या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

शहरातील वॉटर एटीएमची ठिकाणे 

आयसोलेशन हॉस्पिटल, इंदिरानगर, राहटेनगर टोळी, जयतळा बाजार, एकात्मतानगर, जोगीनगर, नरेंद्रनगर, भगवाननगर, चुनभट्टी, सोमलवाडा, पांढराबोडी, खामला जुनी वस्ती, मनीषनगर, सोनेगांव वस्ती, त्रिमूर्तीनगर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 4:27 am

Web Title: toilet uncleanness near water atms center in the nagpur city zws 70
Next Stories
1 मेट्रोचा वेग वाढला, पण प्रवाशांचा ओघ कमीच
2 पोलिसांच्या ‘होम ड्रॉप’चा महिलांना सुखद अनुभव
3 मानव-वन्यजीवांतील संघर्ष रोखण्यात वनखाते अपयशी !
Just Now!
X