१.२० लाख रुग्ण शहरातील; २४ तासांत ६ मृत्यू; ८७७ नवीन रुग्ण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६ करोनाबाधितांचा मृत्यू तर ८७७ नवीन रुग्णांची भर पडली. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या करोनाबाधितांच्या संख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या रुग्णांतील १.२० लाख रुग्ण हे शहरातील आहेत.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील ७१६, ग्रामीणचे १५९, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण ८७७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख २० हजार २१०, ग्रामीण २९ हजार ५१०, जिल्ह्य़ाबाहेरील ९४५ अशी एकूण १ लाख ५० हजार ६६५ रुग्णांवर पोहोचली.  दिवसभरात शहरात ४, ग्रामीण शून्य तर जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८०६, ग्रामीण ७७२, जिल्ह्य़ाबाहेरील ७६३ अशी एकूण ४ हजार ३४१ रुग्णांवर पोहोचली. रुग्णसंख्या जास्त असल्याने मध्यंतरी शहरातील चाचण्यांची संख्या पंधरा हजारांवर गेली होती. परंतु सोमवारी ही संख्या घसरून ८,०५३ वर आली. त्यात शहरातील ६,०१३ तर ग्रामीणच्या २,०४० चाचण्यांचा समावेश आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९१.५२ टक्के

शहरात दिवसभरात ५९३, ग्रामीणला ९३ असे एकूण ६८६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ११ हजार १२६, ग्रामीण २६ हजार ७६० अशी एकूण १ लाख ३७ हजार ८८६ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९१.५२ टक्के आहे.

गंभीर गटातील रुग्णसंख्या पंधराशे पार

जिल्ह्य़ात ८,४३८ सक्रिय  रुग्ण नोंदवले गेले. त्यात शहरातील ७,०२०, ग्रामीणचे १,४१८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांत ५,९७० रुग्णांवर गृहविलगीकरणात तर गंभीर संवर्गातील १,५९१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.