*   एकाच दिवशी नवीन १९ रुग्णांची भर

*   २९७ करोनामुक्त रुग्णालयातून घरी परतले

उपराजधानीत आज गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १९ नवीन करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ४०६ वर पोहचली आहे. यापैकी यशस्वी उपचाराने करोनामुक्त होऊन २९७ जण रुग्णालयातून घरी परतले आहेत.

बुधवारी दिवसभऱ्यात केवळ एकच रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे शहरातील मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांच्या संख्येने तीन आकडी संख्येवरून दोन आकडी संख्या गाठली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी शहरात नवीन १९ बाधित आढळले आहेत. त्यात  मोमीनपुरा परिसरातील १०,  गोळीबार चौकातील १, आमदार निवास आणि व्हीएनआयटी विलगीकरण केंद्रात असलेल्या १० जणांचा समावेश आहे. पैकी गड्डीगोदाम परिसरातील ७ त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांच्या संख्येने चारशेचा टप्पा ओलांडला आहे. नवीन रुग्णांमुळे आता उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पुन्हा तीन आकडय़ांवर (१०२) पोहचली आहे. मोमीनपुरा आणि गोळीबार चौकासह इतरही भागात रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. दरम्यान गुरुवारी मेडिकलमध्ये मोमीनपुरा परिसरातील १३ आणि १० वर्षे वयाच्या दोन मुलांसह ५०, ३२ वर्षीय बाधित  रुग्णांना दाखल करण्यात आले.

मेडिकल, मेयोतील ९ रुग्ण करोनामुक्त

मेडिकल आणि मेयो रुग्णालयात उपचार घेणारे ९ रुग्ण गुरुवारी करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यात मेयोतील ८ आणि चंद्रपूरच्या मेडिकल येथे दाखल असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. मेयोतील करोनामुक्तांमध्ये तीन महिलांसह पाच पुरुषांचा समावेश आहे.

असे वाढले रुग्ण

उपराजधानीत ११ मार्चला पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला होता. ५ एप्रिलला सतरंजीपुरातील व्यक्तीचा करोनामुळे शहरातील पहिला मृत्यू नोंदवला गेला. त्यानंतर १४ एप्रिलला शहरातील रुग्ण संख्या ५०, २५ एप्रिलला १००, ५ मे रोजी १५०, ७ मे रोजी २५०, १२ मे रोजी ३०० तर १७ मे रोजी ३५० वर पोहचली. आता रुग्णसंख्येने चारशेचा टप्प ओलांडला आहे.

लाल क्षेत्रातून शहराला बाहेर न काढण्याची विनंती

राज्य शासनाने टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यासंबंधीचे नवीन आदेश निर्गमित केले आहेत. यातील लाल क्षेत्रामध्ये नागपूरचा समावेश नाही. मात्र शहरातील करोनाबाधित प्रतिबंधित भाग, रुग्णांची वाढती संख्या याबाबत मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. लाल क्षेत्रातून शहराला बाहेर काढू नये, अशी विनंती त्यांना केली आहे. याबाबत शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

– तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.