• शहरात ७०० वर अवैध गोदामे
  • विषारी सुपारी भाग ६

शहरातील विषारी सुपारी साठवण्यासाठी जवळपास ७०० वर छोटी-मोठी गोदामे आहेत. त्यापैकी बहुतांश गोदाम भाडे तत्त्वावर असून त्यांची कुठेही नोंद नाही. नियमानुसार गोदामांची वखार महामंडळांकडे नोंदणी करून ते भाडय़ाने देताना भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना देणे आवश्यक आहे. मात्र, अशा गोदामांचे  नेमका कोणता व्यवसाय चालतो, याची माहिती अनेक वर्षांपासून पोलिसांना देण्यात आली नाही आणि स्थानिक पोलीसही पुढाकार घेऊन शहानिशा करीत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मस्कासाथ हा भाग पूर्वी लकडगंज आणि आता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. याच भागात विषारी सुपारीचा व्यवसाय चालतो. या भागात प्रत्येक घरात गोदाम आहे. निवासी वस्तीतील घराचा काही भाग व्यापाऱ्यांना गोदाम म्हणून भाडय़ाने दिला आहे.

नियमानुसार एखादे घर किंवा गोदाम भाडय़ाने दिल्यानंतर घरमालकांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. पोलिसांकडून भाडेकरू व त्यांच्या व्यवसायाची शहानिशा करण्याची गरज आहे.

मात्र, स्थानिक नागरिक भाडेकरूची माहिती पोलिसांना देत नाहीत आणि पोलीसही पुढाकार घेऊन कारवाई करीत नसल्याची बाब समोर येत आहे.

याशिवाय गोदामाचे बांधकाम करीत असताना वखार महामंडळांची पूर्वपरवानगी घेणे आणि नोंदणी करणे आवश्यक आहे, परंतु तशी नोंदणी करण्यात आली नाही. त्यामुळे गोदामातून चालणाऱ्या अवैध व्यवसायासाठी जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिक करू लागले आहेत.

एका युवासेना नेत्याने सडलेल्या सुपारीला भाजण्याकरिता सल्फर डायऑक्साईडची भट्टी टाकली आहे. ही भट्टी भाडय़ाच्या गोदामात आहे. त्या इमारतीला यापूर्वी दोन वेळा आग लागली होती. तरीही त्या ठिकाणी बिनबोभाटपणे भट्टी सुरू असून पोलिसांतर्फे कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, हे विशेष. (समाप्त)

महापालिकेचेही दुर्लक्ष

लोकांनी निवासी घराचा काही भाग सुपारी व्यापाऱ्यांना गोदाम म्हणून दिला आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून दुप्पट भाडे आकारले जाते. मात्र, पूर्वपरवानगी न घेता निवासी घरांमध्ये अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिकेकडूनही कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. शिवाय या गोदामांना अग्निशमन विभागाची परवानगीही घेण्यात येत नाही, हे विशेष.