विषारी सुपारी (भाग-२)

विदेशातून तस्करी करून भारतात आणलेली सुपारी सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजून ती विकण्याच्या गोरखधंद्यात नागपुरातील ७०० वर व्यापारी गुंतले असून दररोज शेकडो कोटींचा व्यवहार त्यांच्यामार्फत करण्यात येतो. मात्र, हा संपूर्ण व्यापार कच्च्या स्वरूपात चालत असून त्याची कुठेही नोंद होत नाही. याचा शासनाला मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. मस्कासाथ परिसरातील जवळपास प्रत्येक घरात सुपारी व्यवसाय होत असून यात काही व्यापारी दर्जेदार सुपारी विकतात. सडलेल्या सुपारी विक्रीतून बक्कळ नफा मिळत असल्याचे लक्षात आल्यावर अनेक  व्यापाऱ्यांनी त्यात उडी घेतली. कमी गुंतवणूक आणि नफा अधिक असे या व्यवसायाचे सध्याचे स्वरूप आहे. गंधक भट्टीतील सुपारीसाठी प्रतिकिलो १५० प्रतीकिलो गुंतवणूक आहे. मात्र, त्याची विक्री ३ ते ३५० रुपयाने केली जाते. सल्फरच्या भट्टीत भाजल्याने सुपारीला पांढरा रंग येतो आणि तिला टणकपणा लाभतो. त्यामुळे सुपारी सडलेली होती, हे लक्षात येत नाही.

शहरात जवळपास ७०० छोटे-मोठे व्यापारी या व्यवसायात गुंतलेले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने अनेकदा या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. मात्र, या विभागातील काहींचे व्यापाऱ्यांशी संगनमत असून कारवाईच्या नावाखाली केवळ बनाव केला जातो.

दोन ते चार महिन्यातून एखाद्या व्यापाऱ्यावर कारवाई करायची, यातून लोक व प्रशासनाला संशय येत नाही, असा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, लोकांना विष विकणारा उद्योगच बंद करण्यात आला पाहिजे, अशी मागणी वर्षांपासून होत आहे.

आंदोलन करणाऱ्यांनी उघडले कारखाने

काही वर्षांपूर्वी युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने विषारी सुपारीविरुद्ध आंदोलन केले होते. त्यानंतर व्यापाऱ्यांवर दररोज कारवाई केली जात होती. कालांतराने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विषारी सुपारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्याच नेत्याने आता वर्धमानगर-चिखली मार्गावरील सरजा बार परिसरात सल्फर डायऑक्साईडची भट्टी टाकली असून त्या ठिकाणी सडलेली सुपारी भाजण्याचे काम केले जाते. एका किलो सुपारीसाठी येथे आता १५ रुपये शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे.

तीन भट्टीतून पसरते विष

शहरात सडलेली सुपारी भाजण्याचे तीन मोठे कारखाने आहेत. यात राजू एचपी, मौर्या, नेता आणि अब्बास नावाच्या व्यक्तींचा समावेश आहे. अब्बाससोबत युवासेनेच्या नेत्याची भागीदारी आहे. या कारखान्यांमध्ये सडलेली सुपारी सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजली जाते. या प्रक्रियेत सुपारीला सल्फर लागते आणि ती बाजारात विष म्हणून येते. राजू एचपीच्या कारखान्यावर काही दिवसांपूर्वीच कारवाई करण्यात आली. ही भट्टी सध्या बंद आहे. शहरातील ७० टक्के व्यापाऱ्यांची सुपारी नेता यांच्या भट्टीत भाजण्यात येत ती एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यामुळे या भट्टय़ा बंद झाल्यास विषारी सुपारी विकण्यावर बहुतांश प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.