‘लोकसत्ता’ वृत्तमालिकेची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

काजूच्या नावाखाली इंडोनेशिया आणि नायजेरिया येथून आयात केलेल्या सडक्या सुपारी विक्रीच्या संदर्भात ‘लोकसत्ता’च्या वृत्तमालिकाकेची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या सहआयुक्तांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

काजूच्या नावाखाली विदेशातून सडलेल्या सुपारीची तस्करी करण्यात येते. सुपारी बाजारात विकण्यासाठी टणक व्हावी म्हणून तिला सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजण्यात येते. यामुळे सुपारी विषारी होते. ती महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये विकली जाते. सुपारीच्या माध्यमातून एकप्रकारे विषविक्रीचा हा प्रकार आहे. दीड वर्षांपूर्वी युवासेनेच्या नेत्याने या विरोधात आंदोलन केले. मात्र, कालांतराने त्याच नेत्याने हा व्यवसाय थाटला. सुपारीचा व्यवसाय मस्कासाथ परिसरात मोठय़ा प्रमाणात होत असून एका घराआड त्याचे गोदाम आहेत. जवळपास ७०० व्यापारी या व्यवसायात गुंतले असून अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. सुपारी आयात करणे, विक्री करणे आणि वाहतूक करण्याचे सर्व व्यवहार कच्च्या कागदांवर केले जातात. त्यामुळे सरकारचा कोटय़वधींचा महसूलही बुडतो. यासंदर्भातील तपशीलवार माहिती ‘लोकसत्ता’ ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून उघड केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र पाठवले आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत कोणती कारवाई करते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

तस्करीमध्ये यांचा सहभाग

सडलेली सुपारी तस्करी करण्यात आशीफ आणि अल्ताफ या दोघांचे नाव घेण्यात येते. हे दोघेही भाऊ असून त्यांच्याकडून शहरातील इतर व्यापाऱ्यांना सडलेली सुपारी विकण्यात येते. या व्यवसायात हारूभाई, टिकू, जतीन, गनी, नेपाली, आनंद, मेहता, जैन, वेनसानी, गणपती, तिरुपती, अल्ताफ, इमरान, आशिक, वसीम, महेंद्र काल्या आदी मोठे मासे असल्याचे सांगण्यात येते. सल्फरची भट्टी लावणाऱ्यांमध्ये नेता, राजू अण्णा आणि मौर्या यांचा समोवश आहे.