करोनाच्या वाढत्या संकटामुळे व्यापारी दहशतीत

नागपूर : शहरात दररोज करोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असून रुग्णही झपाटय़ाने वाढत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी धास्तावले असून त्यांनी शनिवारी आणि रविवारी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाने शहरात तांडव घालण्यास सुरुवात केली आहे. दररोज मृतांच्या संख्येबरोबरच करोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. सध्या बाजारात शिथिलता मिळाली असल्याने ठराविक बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी होत आहे. यादरम्यान सामाजिक अंतराचे भान राखले जात नसल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्याशिवाय काही नागरिक मास्क देखील बांधत नसल्याचे त्यांनी पाहिले. किराणाओळ आणि इतवारी तसेच गांधीबाग येथे दाट दुकाने आहेत.

रस्तेही अरुंदआहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी येथे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्याशिवाय चिल्लर दुकानदारांची खरेदीही याच भागातून होते. त्यामुळे येथे बरीच वर्दळ असते. त्याशिवाय माल घेऊन जाण्यासाठी कामगार आणि छोटी वाहने नेहमी येत असल्याने किराणाओळ प्रमाणेच इतरही बाजारात गर्दी उसळते. यामुळेच काही व्यापाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. हे सर्व बघता दि नागपूर इतवारी किराणा र्मचट असोसिएशनने दर शनिवारी व रविवारी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात जवळपास ५०० हून अधिक दुकाने आहेत. बहुतांश दुकानात सॅनिटायझर असून दक्षतेचे फलकही लावले आहे. तरी देखील नागरिक याचे उल्लंघन करताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर सर्व सदस्यांची मते जाणून घेतली असता आठवडय़ातून गर्दी होणारे दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा सूर सर्व व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाला. हा निर्णय पारित झाला. त्यामुळे जोपर्यंत करोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत किराणाओळ, इतवारी आणि गांधीबाग येथील दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहणार आहेत. व्यापारी सांगतात नक्कीच या दोन दिवसात व्यावसाय तेजीत असतो. मात्र जीवापेक्षा मोठे काही नाही. त्यामुळे दोन पैसे कमी आले तरी चालतील मात्र आमच्यासह ग्राहकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे.

नागपूर इतवारी किराणा र्मचट असोसिएशनने बैठकीत शनिवारी व रविवारी वाढत असलेल्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली. यामध्ये १०० व्यापाऱ्यांपैकी ९८ व्यापाऱ्यांनी या दोन दिवसात दुकाने बंद ठेवण्यासाठी सूचना केली. त्यानुसार आता शनिवारी व रविवारी या किराणाओळ भागातील ५०० दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

– श्रीप्रताप सिंग, सचिव, दि नागपूर इतवारी किराणा र्मचट असोसिएशन.