मोजकी दुकाने बंद, अनेक ठिकाणी सुरू; इतवारीमध्ये पोलीस- व्यापाऱ्यांमध्ये वाद

नागपूर : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीबाबत संभ्रमावस्था असल्याने नागपुरात मंगळवारी गोंधळाचे वातावरण होते. काही ठिकाणी व्यापारपेठा कडकडीत बंद तर काही ठिकाणी सुरू होत्या. इतवारीमधील शहीद चौकात सुरू असलेली दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना व्यापाऱ्यांच्या विरोधाचा सामाना करावा लागला.

राज्य शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार, आवश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वंगळता सर्व दुकाने बंद ठेवावयची होती. मात्र मंगळवारी सर्वच प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने उघडी होती. रस्त्यावरील फु टकळ विक्रेत्यांपासून तर खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीही त्यांची दुकाने सुरू ठेवली होती. दुसरीकडे महापालिकेचे पथक व पोलीस  जीवनावश्यक वस्तू व आवश्यक सेवेत न मोडणाऱ्या सेवांची  दुकाने बंद करीत होते. व्यापारी  त्यांना पालकमंत्र्यांनी सोमवारी जारी केलेल्या संदेशाची आठवण करून देत होते.

यातून पोलीस विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा राहिला. इतवारी, महाल, जरिपटका , पाचपावली आणि सक्करदरा या भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याला विरोध केला. शहीद चौकात व्यापाऱ्यांसह कामगारांनी करोना नियमांची पायमल्ली करत  आंदोलन केले.  एप्रील व मे महिन्यात सणासुदीचे दिवस असताना दुकाने बंद ठेवण्यात आली तर व्यापार संकटात येणार असल्याचे मत अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी  व्यक्त केले. दरम्यान पोलिसांनी जमावाला शांत केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.  कमाल चौक, जरीपटका , खामला आदी बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. सक्करदरा व बर्डी परिसरात व्यापाऱ्यांनी अर्धवट शटर उघडून ठेवले होते.

बाजारात ग्राहकांचीही गर्दी

टाळेबंदीबाबत संभ्रमावस्था असल्याने नागरिकांनीही बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे दुपापर्यंत सर्वच बाजारपेठांमध्ये ही टाळेबंदी दिसत नव्हती. खासगी कार्यालयेही सुरू होती. आवश्यक वस्तूंच्या नावाखाली अनेकांनी इतर वस्तूंचीही विक्री केली.

चहाच्या दुकानात झुंबड

रस्त्याच्या कडेला ठेल्यावर खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा असताना सक्करदरा तिरंगा चौक, बर्डी, नंदनवन, महाल, इतवारी, गांधीबाग या परिसरात लोक त्याच ठिकाणी  नास्ता करत होते. पोलिसांकडून  कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

जमावबंदीचाही फज्जा

दिवसा जमावबंदी लागू असतानाही  पानटपरी, चहाचा ठेला किंवा भाजी बाजारात पाचपेक्षा अधिक लोक एका ठिकाणी गर्दी करून उभे असल्याचे चित्र ठिकठिकाणी होते. सीताबर्डी परिसरात ऑटोचालक  एकत्र बसले होते.  किराणा दुकानात जमावबंदीचा आदेश धुडकावला जात होता.