वाढता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत. त्या निर्बंधांची अमलबजावणी प्रत्यक्ष सोमवारी रात्री ८ पासून सुरू झाली. दरम्यान नागपुरात लॉकडाउनला विरोध करत व्यापारी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. शाहीद चौकात व्यापारी रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला होता.

मंगळवारी सकाळपासून इतवारी मधील शहीद चौकातील बाजारपेठत व्यापारी व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले आणि दुकाने सुरू केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दुकानं बंद करण्यास सांगितलं. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शहीद चौकात विरोध करत आंदोलन केलं.

किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये सराफा व्यापारी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. व्यापारी आपापल्या दुकानांसमोर उभे राहिले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शाहीद चौक परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.

ठाणे, रत्नागिरीतही विरोध
ठाण्यातही व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनला विरोध करण्यात आला. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी १० व्यापाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे रत्नागिरीतही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. पण कारवाईच्या इशाऱ्यानंतर दुकाने बंद करण्यात आली.

३० एप्रिलपर्यंत राज्यातकठोर निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्बंधातून शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतुकीला वगळण्यात आलं आहे. खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्रीपासून तर सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण टाळेबंदी राहणार आहे. मद्यविक्रीची सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असे उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक गोतमारे यांनी कळवले आहे. याशिवाय राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

हे सुरू राहील
– किराणा, औषध, भाजीपाला
– वृत्तपत्रे छपाई आणि वितरण
– सर्व प्रकारची वाहतूक
– शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक
– उद्योग व उत्पादन क्षेत्र
– ई-कॉमर्स सेवा
– बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषध, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये.

हे बंद राहील
– मनोरंजन व करमणुकीची स्थळे
– क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क
– सर्वधर्मीयांची स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद
– केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स, स्पा
– शाळा- महाविद्यालये बंद राहतील. १० व १२ परीक्षांचा अपवाद. खासगी शिकवण्या बंद
– उद्याने, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णत: बंद
– खासगी कार्यालयांना पूर्णपणे ‘वर्क फ्रॉम’ होम
– रस्त्याच्या कडेवरील खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत के वळ पार्सलसाठी मुभा.
– उपाहारगृहे व बार पूर्णत: बंद. पण, उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर – अभ्यागतांसाठीच सुरू
– शासकीय कार्यालये