‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे आवाहन

नागपूर : कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीसह नवीन पर्याय व नवनवीन संशोधने स्वीकारणे आवश्यक असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी ‘मन की बात’च्या ७५ व्या भागात ते बोलत होते.

श्वेतक्रांतीच्या वेळी देशाने शेतीतील नवीन पर्यायाचा अनुभव घेतल्याचे सांगताना मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय असून मधमाशी पालन देशात मध किंवा मधुर क्रांतीचा पाया रचत असल्याचे सांगितले. शेतकरी आज मोठ्या संख्येने यात सहभागी होत नवसंशोधन करत असून पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील गुरदुम या गावाचे, सुंदरबन परिसरातील नैसर्गिक सेंद्रिय मधाचे व गुजरातमधील बनासकांठातील मधुर क्रांतीचा नवीन अध्याय लिहिणाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणे त्यांनी दिली.  ‘मन की बात’मध्ये मोदींनी याला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याशी जोडत दांडीयात्रेची आठवण करून दिली. दांडीयात्रेपासून भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवाची सुरुवात होत असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून  तो साजरा केला जाणार असल्याचे मोदींनी सांगितले. ‘जनता कफ्र्यू’ हा शब्द प्रथमच ऐकला होता. मात्र संपूर्ण देशाने तो पाळला हे सांगत आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवला जात असल्याचे सांगत ‘दवाई भी-कडाई भी’ हा मंत्रही दिला.