मंगेश राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या व रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून लोकांना आता वाहतुकीच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली, परंतु खासगी बसमुळेच वाहतूक कोंडी होत असून इतर शहरांप्रमाणे उपराजधानीतील खासगी बसचे थांबे शहराबाहेर नेण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

शहराचा विकास मोठय़ा झपाटय़ाने होत आहे. पूर्वी सर्वात मोठे व गुळगुळीत रस्त्यांसाठी राज्यभरात उपराजधानीचे नाव होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. मेट्रो, सिमेंट रस्ते, उड्डाण पुलांच्या कामांमुळे रस्ते खोदलेले आहे. अनेक रस्त्यांवरची दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोठी वाहने समोर असली तर वाहतूक कोंडी होते. शिवाय वाहनांची संख्या भरमसाट झाली असल्याने रस्त्यांवर मुंगीच्या गतीप्रमाणे वाहने धावताना दिसत आहेत. खासगी बसगाडय़ांकरिता वाहनतळही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठय़ा बसगाडय़ा उभ्या राहतात. प्रवाशांना बसवण्याकरिता रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहात असल्याने संपूर्ण रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होऊन अनेकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. खासगी बसगाडय़ांमुळे वाहतूक कोंडीची समस्या शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर बघावयास मिळते. गणेशपेठ परिसरात या बसगाडय़ांच्या थांब्यांमुळे प्रवाशांच्या तिकिटांवरील दलाली मिळवण्याकरिता तरुणांमध्ये गटबाजी होऊन गुन्हेगारीकरण झाले आहे. त्या बाबीची दखलही उच्च न्यायालयाने घेतली व जनहित याचिका दाखल करून घेतली होती. ती याचिका निकाली निघाली. मात्र, त्या याचिकेचा विशेष असा उपयोग झाला नाही. आजही गणेशपेठ परिसरातील गुन्हेगारी व खासगी बसगाडय़ांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

न्यायालयाचा अवमान

दरम्यान, न्यायालयाने खासगी बस थांबे शहराबाहेर नेण्याचा पर्याय प्रशासनाला दिला होता. त्यावेळी शहरातील ८३ बस कंपन्यांच्या संचालकांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून रस्त्यांवर वाहने उभी न करण्याची व रस्त्यारस्त्यांवर वाहने न थांबवण्याची हमी दिली होती. त्या आधारावर न्यायालयाने याचिका निकाली काढली. मात्र, बस संचालकांकडून पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू असून रस्त्यांवर वाहने उभी करून प्रवाशी बसवण्यात येत आहे.

थांबे शहराबाहेर नेण्याची शिफारस

वर्षभरापूर्वी तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांनी शहराच्या वाहतूक कोंडीसंदर्भात एक अहवाल तयार केला होता. त्यात खासगी बसगाडय़ांचे थांबे शहराबाहेर नेण्याची शिफारस केली होती. हा अहवाल न्यायालयात सादरही केला होता. त्यानुसार पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या बसगाडय़ांसाठी वाडी परिसरात थांबा द्यावा  तसेच हैदराबाद मार्गावरील बससाठी खापरी, जबलपूर मार्गासाठी कोराडी नाका किंवा कामठी मार्गावरील ट्रान्सपोर्ट प्लाझा आणि कलकत्ता मार्गासाठी पारडी परिसरात थांबे निर्माण करता येऊ शकतात. त्यासाठी त्या परिसरात जुन्या जकात नाक्याची जागाही उपलब्ध आहे.

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये शहरबंदी

वाहतूक कोंडीचा फटका अनेक शहरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये खासगी बसगाडय़ांना शहराच्या हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि नाशिकचा समावेश आहे. लहान शहरांचा विचार केला, तर गडचिरोली जिल्ह्य़ातील वडसा येथेही खासगी बसगाडय़ांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय बंगळुरू व हैदराबाद या शहरांमध्येही बसगाडय़ांना प्रवेशबंदी आहे. त्या शहरांमध्ये बस संचालक प्रवाशांना बस थांब्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कारचा वापर करतात. ही सुविधा नागपुरातही निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होईल.

तीन हजारांवर खासगी बसगाडय़ा

शहर व पूर्व नागपूर प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत ३ हजार ९० बसगाडय़ांची नोंदणी करण्यात आहे. यात स्लीपर क्लासच्या ५० गाडय़ात आहेत. यातील काही बसगाडय़ा भंगार झाल्या असतील. शहरातून व शहरमार्गाने जवळपास एक हजार २०० खासगी बसगाडय़ा धावत असून त्यापैकी ३०० बसगाडय़ा मुंबई, पुणे, औरंबागाद, हैदराबाद अशा लांब अंतरावर धावत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागातर्फे मिळाली.

चर्चा करुन निर्णय घेऊ

खासगी बसचे थांबे अनेक शहरांनी शहराबाहेरच्या हद्दीत ठेवले आहेत. त्यादृष्टीने शहराबाहेर असलेल्या जागांचा अभ्यास करून बस थांबे शहराबाहेर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी महापालिका व खासगी बस संचालकांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल.

– राज तिलक रोशन, वाहतूक पोलीस उपायुक्त.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic collision due to private buses
First published on: 19-09-2018 at 03:19 IST